Join us

काँग्रेसला शिवसेना, भाजपाचे कडवे आव्हान

By admin | Updated: October 8, 2014 01:48 IST

मुळात पंचरंगी दिसणाऱ्या या लढतीत काँग्रेसला मुख्य आव्हान हे शिवसेना आणि भाजपाचे असेल. मराठी मतांचे अधिक्य असलेल्या या मतदारसंघात परप्रांतीय मतेच निर्णायक ठरतील.

चेतन ननावरे, मुंबईबहुभाषिकांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या चारही पक्षांच्या तगड्या उमेदवारांचा सामना काँग्रेसच्या अ‍ॅनी शेखर यांना करावा लागणार आहे. मुळात पंचरंगी दिसणाऱ्या या लढतीत काँग्रेसला मुख्य आव्हान हे शिवसेना आणि भाजपाचे असेल. मराठी मतांचे अधिक्य असलेल्या या मतदारसंघात परप्रांतीय मतेच निर्णायक ठरतील.कुलाब्यात मराठी मतांसह दलित, मुस्लीम, गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांचेही प्राबल्य आहे. मोठ्या संख्येने असलेल्या झोपडपट्टीतले प्रश्न सोडवण्यात स्थानिक आमदार अपयशी ठरल्याचे चित्र आहे. जुन्या चाळींचा आणि इमारतींचा प्रश्न आज गंभीर अवस्थेत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करणारे काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा या ठिकाणी पिछाडीवर होते. ही पिछाडी भरून काढण्याचे आव्हान शेखर यांच्यासमोर आहे. त्यात शेखर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या युवा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत काँग्रेसच्या अडचणींत भर टाकली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक काँग्रेससाठी म्हणावी तितकी सोपी राहिलेली नाही.मागील विधानसभा निवडणुकीत पुरोहित यांना शेखर यांच्याकडून हार पत्करावी लागली होती. त्या वेळी मनसे लाटेमुळे शिवसेनेची समजली जाणारी मराठी मते त्यांच्यापासून दुरावली होती. यंदाही शिवसेना आणि भाजपामध्ये सुरू असलेल्या मराठी विरुद्ध गुजराती वादामुळे ही मते पुन्हा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ गुजराती मतांवर विजय मिळवणे त्यांच्यासाठी कठीण आहे.शिवसेनेचे पांडुरंग सपकाळ यांना सुरुवातीला मुंबादेवीतून उमेदवारी दिल्याची चर्चा होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी त्यांचा मतदारसंघ बदलण्यात आला. मात्र त्यामुळे त्यांच्या मतांत फार फरक पडेल असे वाटत नाही. कारण लोकसभा निवडणुकीत सावंत यांच्यासोबत कुलाबा, मुंबादेवी व मलबार हिलमध्ये त्यांनी नेतृत्व केले होते. परिणामी येथील मराठी मतांनी सावंत यांच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे मनसेने हिरावलेल्या मतांवर आपलाच अधिकार असल्याचे सपकाळ यांनी सिद्ध केले आहे. मात्र इतर मते मिळवल्याशिवाय विजयाला गवसणी घालणे त्यांना कठीण आहे.मनसेतर्फे या वेळी पुन्हा एकदा अरविंद गावडे यांना संधी देण्यात आली आहे. गेल्या वेळी पराभूत झालेल्या गावडे यांना लोकसभा निवडणुकीतही बाळा नांदगावकर यांना समाधानकारक मते मिळवून देण्यात अपयश आले होते. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दुरावलेली मराठी मते पुन्हा मिळवण्यात त्यांना खूपच आटापिटा करावा लागणार आहे. याउलट गेल्या १५ वर्षांत काँग्रेससोबत आघाडीत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बशीर मुसा पटेल रिंगणात आहेत. मात्र ते केवळ काँग्रेसच्या मतांत फूट पाडण्याचे काम करतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांना जितकी अधिक मते मिळतील, तितका काँग्रेसच्या पराभवाच्या शक्यता बळावणार आहेत.