Join us  

काँग्रेस शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार

By admin | Published: September 05, 2015 2:16 AM

दुष्काळावर प्रभावी उपाययोजना व शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवन येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेणार आहे.

मुंबई : दुष्काळावर प्रभावी उपाययोजना व शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवन येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेणार आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात पक्षाचे आमदार व प्रदेश पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल. या भेटीमध्ये काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यातील भयावह दुष्काळी स्थिती राज्यपालांच्या निदर्शनास आणून देणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुष्काळी भागाची पाहणी केली. परंतु लोकप्रतिनिधींना विशेषत: विरोधी पक्षाच्या आमदारांना या दौऱ्यातून बाजूला ठेवण्यात आले होते. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांचे निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने सर्वच आमदारांच्या अपेक्षा व जमिनीवरील वस्तुस्थिती जाणून घेतली तर त्याचा सरकारला व शेतकऱ्यांना फायदाच होईल, असे काँग्रेसने म्हटले आहे. राज्यपालांना भेटल्यानंतर दुष्काळी परिस्थिती आणि पुढील काळातील काँग्रेस पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी चव्हाण यांनी दुपारी गांधी भवन येथे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदी नेते उपस्थित राहणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)