प्रवाशांचे हाल करणाऱ्या 'इंडिगो'विरोधात काँग्रेस आक्रमक; मुंबई विमानतळावर जोरदार घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 21:12 IST2025-12-09T21:10:56+5:302025-12-09T21:12:32+5:30
IndiGo Congress Protest: इंडिगोच्या मनमानी कारभारामुळे देशभरातील प्रवाशांचे प्रचंड हाल

प्रवाशांचे हाल करणाऱ्या 'इंडिगो'विरोधात काँग्रेस आक्रमक; मुंबई विमानतळावर जोरदार घोषणाबाजी
IndiGo Congress Protest: इंडिगो एअरलाईन्सच्या सततच्या गोंधळामुळे हजारो प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विमानांची उड्डाणे रद्द करणे, सतत प्रवाशांना होणारा उशीर, कोणतीही स्पष्ट माहिती न देणे आणि प्रवाशांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक या सर्व प्रकारांनी प्रवासी त्रासलेले आहेत. इंडिगोच्या या कारभारा विरोधात आज मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विमानतळाच्या T2 टर्मिनलवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करून निषेध केला. यावेळी केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधातही नाराजी व्यक्त करण्यात आली.
आंदोलनाच्या वेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, इंडिगो एअरलाईन्सचे प्रशासन आणि व्यवस्थापन अक्षरशः कोलमडलेले आहे. प्रवाशांचे हाल होत असताना केंद्र सरकार मूक असून केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. हे केवळ दुर्लक्षच नाही, तर प्रवाशांच्या हक्कांवर केलेला प्रहार आहे. देशातील सर्वात मोठी एअरलाईन जबाबदारी शून्य कारभार करते हा प्रकार आम्ही अजिबात सहन करणार नाही.
मागण्या काय?
केंद्र सरकारने तात्काळ इंडिगो एअरलाईनवर प्रवाशांची फसवणूक, चुकीची माहिती आणि सेवेत कसून व ढिसाळपणा यासाठी कठोर आर्थिक दंड लावावा. उड्डाणे रद्द, विलंब झालेल्या सर्व प्रवाशांना तात्काळ अनिवार्य भरपाई देण्यात यावी. प्रवाशांना आर्थिक व मानसिक नुकसानीचीही भरपाई द्यावी. कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी. केंद्र सरकारने तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी. प्रवाशांच्या सुरक्षेला आणि अधिकारांना धोका निर्माण केल्याबद्दल गुन्हेगारी कारवाईचा विचार करावा, अशा मागण्य काँग्रेसने केल्या.
देशातील नागरी उड्डाण क्षेत्रासाठी कडक सेवा-हमी कायदा लागू केला जायला हवा. एअरलाईन्सने प्रवाशांची फसवणूक केली तर तत्काळ कारवाई होईल अशी प्रणाली तयार करावी. जर सरकार आणि इंडिगो प्रशासनाने या मागण्या मान्य करून तातडीने सुधारणा केल्या नाहीत, तर हे आंदोलन आणखी उग्र करू आणि प्रवाशांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून मोठा लढा उभारू ,असा इशाराही मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरी यांनी दिला आहे.