Join us

काँगे्रसमधील गटबाजी सुरूच

By admin | Updated: May 13, 2015 01:17 IST

महापालिका निवडणुकीनंतर काँगे्रसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. चर्चेत सहभागी करून घेण्यावरून एकमेकांवर चिखलफेक सुरू

नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिका निवडणुकीनंतर काँगे्रसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. चर्चेत सहभागी करून घेण्यावरून एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. महापालिका मुख्यालयासमोर पक्षाच्या नेत्यांना लाखोल्या वाहण्यात आल्या असून, वेळेत हे प्रकार थांबले नाहीत तर पक्षाचे आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँगे्रसचा बालेकिल्ला होता. परंतु गटबाजीमुळे दिवसेंदिवस पक्षाची ताकद कमी होत गेली. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष चक्क चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. गत महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाचे १३ नगरसेवक होते. यावेळी फक्त १० नगरसेवक निवडून आले आहेत. सर्व पक्षांची ताकद दिवसेंदिवस वाढत असताना काँगे्रस मात्र अस्तित्व गमावत आहे. पक्ष वाढविण्यापेक्षा एकमेकांचे पाय ओढण्यासाठीच जास्त वेळ खर्ची घातला जात आहे. एकेकाळी काँगे्रसमध्येच असलेल्या मंदाताई म्हात्रे प्रसंगावधान राखून राष्ट्रवादीमध्ये गेल्या. त्यामुळेच त्यांना विधानपरिषद सदस्य व नंतर भाजपातून आमदारपदापर्यंत मजल मारता आली. तुर्भेतील डी. आर. पाटील परिवारही राष्ट्रवादीमध्ये गेला. शहरातील पक्षाचे नेते नामदेव भगत यांच्याविरोधात पक्षातीलच काहीजणांनी विरोधात काम केल्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेमध्ये जाणे पसंत केले. महापालिका निवडणुकीनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. १० सदस्य असलेल्या काँगे्रसला उपमहापौरपद व विषय समित्यांचे सभापतीपद देण्याचा निर्णय झाला आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवूनही काँगे्रस सर्वाधिक यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सत्तेत राहून पुढील पाच वर्षांत पक्षवाढीसाठी प्रयत्न करता येतील, असे मत व्यक्त केले जात होते. निवडणुकीपूर्वी अनेक नगरसेवक पक्ष सोडून गेल्यामुळे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात होती. परंतु निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या वाशीत ५ उमेदवार जिंकून आणले. त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. रमाकांत म्हात्रे यांनीही २ जागा जिंकून आणल्या. इतरांना मात्र फारसा प्रभाव पाडता आला नाही. आघाडीची चर्चा करताना जेष्ठांना बरोबर घेतले नसल्यामुळे संघटनेमध्ये वाद पुन्हा सुरू झाले आहेत. महापौर - उपमहापौर निवडणुकीच्या वेळी महापालिका मुख्यालयाबाहेर काँगे्रस कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काँगे्रसबरोबर सर्वच राजकीय पक्षांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सत्तेत जाऊनही काँगे्रसमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे पाहून पक्षातीलही काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील एखाद्या निर्णयाविषयी काही मतभेद असतील तर ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडणे आवश्यक होते. जाहीर प्रदर्शन मांडणे योग्य नसल्याचेही बोलले जात आहे. संघटनेतील मतभेद थांबविले नाहीत तर काँगे्रसचे नुकसान रोखण्यासाठी विरोधकांची गरज पडणार नाही, असे बोलले जात आहे.