Join us  

एकच नंबर अनेकांना मिळाल्याने लॉगइनचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 6:46 AM

आर्किटेक्चरच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) ही प्रवेशपरीक्षा १४ एप्रिल रोजी मुंबईत पार पडली.

मुंबई : आर्किटेक्चरच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) ही प्रवेशपरीक्षा १४ एप्रिल रोजी मुंबईत पार पडली. मात्र, एकच सीस्टम नंबर अनेक विद्यार्थ्यांना मिळाल्याने, त्यांना परीक्षेसाठी लॉगइन करणे अवघड झाले. नाटाचे परीक्षा प्रशासन आणि सेंटर म्हणून महाविद्यालयांचे प्रशासन यांच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. याची तक्रार अनेक पालकांनी नाटा प्रशासनाला पत्र लिहून केली आहे.मागील काही वर्षांपासून देशातील वास्तुशास्त्र महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी परिषदेकडून नाटा ही परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी यंदापासून ही प्रवेशपरीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय कौन्सिलने घेतला. त्यातील पहिला टप्प्यातील पहिली प्रवेशपरीक्षा १४ एप्रिल रोजी घेण्यात आली. मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी वांद्रे येथील थोडमल साहनी कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग हे महाविद्यालय परीक्षेचे केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले होते. या परीक्षेसाठी महाराष्ट्रभरातून विद्यार्थी येतात, परंतु महाविद्यालय प्रशासनाने परीक्षेसाठी योग्य नियोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे परीक्षा सुरू व्हायला उशीर झाला.विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सीस्टम नंबर देण्यात येतो. त्याद्वारे त्यांना लॉगइन करता येते, परंतु अनेक विद्यार्थ्यांना एकच सीस्टम नंबर मिळाल्याने अनेकांचे लॉगइन परीक्षेच्या वेळी होऊ शकले नाही. लॉगइन गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आधी परीक्षा दिली, मग इतरांनी परीक्षा दिली. त्यामुळे पेपरही फुटल्याची भीती पालकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या एका बॅचची परीक्षा सकाळी पावणेबारा वाजता, तर दुसऱ्या बॅचची परीक्षा दुपारी पावणेदोनला सुरू झाली, अशी माहिती विद्यार्थी तसेच पालकांनी दिली. बराच वेळ गेल्याने त्यांच्यावर दिवसभर उपाशी राहण्याची वेळ आली. त्यातच केंद्रावर परीक्षा देणार असलेल्या ४०० विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन अधिकारी आणि अपुºया सुविधा होत्या. परीक्षेत आकृत्या काढण्यासाठीही पुरीशी जागा या सेंटरवर नव्हती, अशी तक्रारही विद्यार्थ्यांनी केली. दरम्यान, यासंदर्भात कला संचनालयाच्या अधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.>‘पुढील परीक्षेवेळी सुधारणा करावी’परीक्षेसाठीच्या ढिसाळ नियोजनचा विद्यार्थ्यांसह पालकांनी निषेध केला असून, नाटा प्रशासनाला या संदर्भात मेल केला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या श्रेणीवर होऊ नये आणि पुढील ७ जुलै रोजी होणाºया परीक्षेच्या वेळी यात सुधारणा करून, योग्य ती काळजी घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या मेलद्वारे केली आहे.