घराबाहेर खेळणारे मूल बेपत्ता झाले, शोधूनही सापडले नाही तर पालक आणि त्यांचे नातेवाईक पोलिसांवर खापर फोडतात. पोलीस ठाण्यांवर मोर्चे आणतात. पोलिसांवर आरोप करणारे, पोलिसांविरोधातल्या मोर्चात सहभागी होणारे पालक प्रत्यक्षात घराबाहेर खेळणाऱ्या, शाळा-शिकवणीवरून परतताना आपल्या पाल्यांच्या सुरक्षेबाबत सजग आहेत का? लहान मुलांची चोरी, अपहरण हे गुन्हे अनंत काळापासून सुरू आहेत. मात्र आसपास घडणाऱ्या घटनांमधून धडा घेण्याऐवजी आजही पालक सुरक्षा यंत्रणा, नशिबावर खापर फोडताना दिसतात. पालकांनी ही धोक्याची घंटा वेळीच ओळखून सतर्क राहणे, पाल्यांना सुरक्षेविषयी सजग करणे ही काळाची गरज बनली आहे.उभ्या-आडव्या पसरलेल्या मुंबई शहरात दिवसाला सरासरी दोन ते तीन मुले बेपत्ता होतात. यातली १४ ते १८ वर्षे वयोगटातली मुले ही आपल्या मर्जीने घर सोडतात, काही प्रेमप्रकरणांतून पळून जातात, काहींचे खंडणीसाठी अपहरण होते. जन्माला आल्यापासून आठ किंवा दहा वर्षे वयोगटातील मुले ही हेतूपुरस्सरच पळवली जातात. या वयोगटातल्या बालिकांना वासना शमविण्यासाठीची विकृत वृत्ती अपहृत करते. मूल न होणाऱ्या दाम्पत्यांना अवैधपणे विक्रीसाठी, परदेशात धाडण्यासाठी, भीक मागणाऱ्या टोळीत सहभागी करून घेण्यासाठी या मुलांचे अपहरण होते, असे पोलीस सांगतात.घराबाहेर खेळणाऱ्या, अवेळी वस्तू खरेदीसाठी बाहेर पडलेल्या, शाळा-शिकवणीतून घरी परतणाऱ्या लहान मुलांना विविध आमिष दाखवून आरोपी आपल्या जाळ्यात ओढतात. चॉकलेट, आईस्क्रीम किंवा खाऊच्या आमिषाने सर्वाधिक मुले गुन्हेगारांच्या तावडीत सापडतात. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार सध्या परिस्थिती कशी आहे हे पालकांना माहीत नाही का? रस्त्यात अनोळखी व्यक्तीने बोलावले, आमिष दाखवले तर त्याला बळी पडू नये, हे मुलांच्या मनावर बिंबवण्याची जबाबदारी पालकांची नाही का?मुळात पालकांनीच सतर्क राहणे आवश्यक आहे. नेमक्या परिस्थितीची जाणीव आधी स्वत: करून घेणे, त्याबाबत गंभीर असणे आणि आपल्या मुलांनाही धडे देणे आजघडीला आवश्यक बनले आहे. मूल घराबाहेर खेळत असेल तर थोड्या थोड्या वेळाने त्याच्याकडे लक्ष ठेवावे, अधूनमधून त्याला अनोळखी व्यक्तींशी बोलू नये याची आठवण करून द्यावी, कोणी जबरदस्ती सोबत नेण्याचा प्रयत्न करत असेल तर आरडाओरडा करून मदत मागावी हे शिक्षण अगदी लहान वयापासून मुलांना द्यायला हवे.राज्य पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार लहान मुलांवरील अत्याचाराचा आलेख झपाट्याने वाढतो आहे. २०१२ च्या तुलनेत २०१३मध्ये लहान मुलांचे अपहरण, त्यांच्यावरील लैंगिक, शारीरिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल ९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१३मध्ये अल्पवयीन बालकांसोबत घडणाऱ्या गुन्ह्यांनी ४० हजारांचा आकडा पार केला. यापैकी १२ हजार ३६२ गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. अपहरणाचा गुन्हा दाखल, मात्र तपास ढिम्मन्यायालयाच्या आदेशांनुसार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करतात. प्रत्यक्षात मात्र अपुरे मनुष्यबळ, इच्छाशक्तीचा अभाव यामुळे पोलीस अशी प्रकरणे फार गांभीर्याने हाताळत नाहीत. हे वास्तव अपहृत आणि पोलिसांनी शोधून काढलेली या आकडेवारीतल्या तफावतीतून अधोरेखित होते.कायद्यातील बदलामुळे अपहरणाच्या गुन्ह्यात वाढमुळात अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये हरविलेल्या मुलांचा समावेश करण्यात आल्याने अपहरणाच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना दिली.५ फेब्रुवारी २०१५ - मुंब्रा परिसरातून ५ फेब्रुवारी रोजी अपहरण करण्यात आलेल्या १३ वर्षांच्या मुलीला एमडी ड्रग देऊन पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. अपहरणानंतर तब्बल दोन आठवड्यांनी या तरुणीचा शोध लागला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीही गजाआड केले. १ मार्च २०१५ - अंधेरीत राहणाऱ्या एका ५ वर्षांच्या चिमुरडीला एका रिक्षाचालकाने चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेले. पुढे आरे कॉलनीतल्या सुनसान इलाख्यात तिच्यावर बलात्कार केला. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची सर्व युनिट्स युद्धपातळीवर या रिक्षाचालकाचा शोध घेत होते. अखेर रिक्षाचालकाला गजाआड करण्यात आले. ६ मार्च २०१५ - रंगपंचमीनिमित्त घराबाहेर पडलेला शैलेश गोसावी हा १२ वर्षांचा विद्यार्थी अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अत्याचाराचे असेही बळी...२ आॅक्टोबर २०१३ : रोजगारासाठी जालन्याहून मुंबईत आलेल्या १४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून आझाद मैदानात त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. अत्याचारानंतर रस्त्यावर भीक मागणारा हा मुलगा एका सामाजिक संस्थेला सापडला. पोलिसांनी आरोपीला माहीममधून अटक केली. २४ आॅक्टोबर २०१४ : अॅण्टॉप हिल येथे मोठ्या भावासोबत दुकानाबाहेर फटाके वाजवणाऱ्या ९ वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून एका तरुणाने पळवून नेले. एकांतात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पुढे ही मुलगी स्वत:हून घराच्या दिशेने परतली आणि तिने घडला प्रकार पालकांना सांगितला. वडाळा टीटी पोलिसांनी अब्दुल शाह (१९) या तरुणाला अटक केली. एका सहा वर्षांच्या मुलीला पळवून नेताना स्थानिकांनी त्याला पकडले. चौकशीत त्याने अॅण्टॉप हिलचा गुन्हाही कबूल केला. २५ आॅक्टोबर २०१४ : शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या ११ वर्षांच्या मुलीचे घराशेजारील शिंप्याने अपहरण केले. दुकानात नेऊन तिचे हातपाय बांधले, तोंंडात बोळा कोंबला. लैंगिक अत्याचार केले. या मुलीला जिवंत सोडल्यास अटक होणार या भीतीने त्याने तिची हत्या केली. रात्री तिचा मृतदेह कचराकुंडीत फेकून पुन्हा दुकानात परतला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आरोपी मुलीच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला. पोलीस ठाण्यावर आलेल्या मोर्चातही तो हजर होता.
गाफील पालक
By admin | Updated: March 25, 2015 01:02 IST