Join us  

फोर्ट परिसरात बनावट विदेशी मद्य जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 1:31 AM

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क अ विभाग मुंबई शहर यांनी फोर्ट परिसरात छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी मद्याचा ...

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क अ विभाग मुंबई शहर यांनी फोर्ट परिसरात छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त केला. या परिसरात दुचाकीवरून बनावट विदेशी मद्य (स्कॉच)ची वाहतूक करताना आत्ताईल कुमारन हरीदासन या आरोपीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये अटक केली.

त्याने दिलेल्या माहितीनुसार, गोडावूनमध्ये व गोडावूनसमोर असलेल्या चारचाकी वाहनामध्ये लपवलेला विदेशी मद्यसाठा जप्त केला. सदर मद्य साठ्यामध्ये विविध ब्रॅण्डच्या एकूण १३० बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत सुमारे १ लाख ६७ हजार ५७२ रुपये आहे. याशिवाय एमएच ०१ एजी ८७७५ ही दुचाकी व एमएच ४३ व्ही ४९०४ हे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. एकूण मद्यसाठा व वाहनांची किंमत सुमारे ५ लाख ८७ हजार ५६३ रुपये आहे.

आरोपीविरोधात गुन्हा क्रमांक ०८-ए-२०१९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये हलक्या प्रतीचे मद्य टाकून त्या बाटल्या विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अशा प्रकारे अनधिकृतरीत्या मद्य खरेदी करू नये, असे आवाहन विभागाने केले आहे.