Join us  

पावसाळ्यात तात्पुरत्या कोविड काळजी केंद्रांबाबत चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 1:35 AM

पालिकेचा दावा : रुग्णांची गैरसोय होणार नाही; खात्रीसाठी अधिकाऱ्यांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मेअखेरीस ४० हजारांहून अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने मुंबईतील वरळी, गोरेगाव या ठिकाणी असलेल्या काही मोठ्या जागांमध्ये कोविड काळजी केंद्रे उभारली आहेत. मात्र पावसाळ्यात या केंद्रांमध्ये रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हा धोका लक्षात आल्यानंतर आता या उपचार केंद्रात दिल्या जाणाºया वैद्यकीय सेवा सुविधांवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची खात्री करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आतापर्यंत ४६ हजारांवर पोहोचली आहे, तर यापैकी १८ हजारांहून अधिक कोरोनामुक्त झाले आहेत.  होम क्वारंटाइन असलेले नऊ हजार रुग्णही बरे झाले आहेत. सध्या २४ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांची संख्या वाढून जूनपर्यंत लाखाच्या घरात असेल, असा अंदाज असल्याने पालिका प्रशासनाने एक लाख खाटांची सोय पालिका रुग्णालय, कोविड काळजी केंद्रात केली आहे. यामध्ये महालक्ष्मी रेसकोर्स येथील तीनशे, गोरेगाव नेस्को केंद्र येथे १२००, वरळी एनएससीआय येथे ६५० खाटा आदींचा समावेश आहे.

मात्र यापैकी बहुतांश ठिकाणी अद्याप ५० ते १०० रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. बुधवारी मुंबईवर ओढवलेल्या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन वांद्रे-कुर्ला संकुलातील अडीचशे रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले. गेल्या काही वर्षांत मुसळधार पाऊस पडल्यास अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे पालिकेच्या या तयारीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र ही उपचार केंद्रे उभारताना मुंबईतील सरासरी पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन उभारल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे.

खबरदारीची उपाययोजना...अधिक क्षमतेची उपचार केंद्रे ही महापालिकेच्या नियोजनाचा भाग आहेत. या उपचार केंद्रांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी टप्प्याटप्प्याने रुग्ण पाठविण्यात येत आहेत. तसेच अनपेक्षितपणे उद्भवलेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून यापूर्वीच कार्यरत झालेल्या उपचार केंद्रांमधील रुग्णांना इतर ठिकाणी असलेल्या पक्क्या बांधकामाच्या उपचार केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाºयांची नियुक्ती...या उपचार केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी इत्यादींचा समावेश असलेल्या मनुष्यबळाची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. तसेच यापुढेही त्या-त्या वेळच्या गरजांनुसार या ठिकाणी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले जाणार आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.