Join us  

अंधेरीच्या गोखले पूलाचे काम पूर्ण; वाहतुकीस खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 8:20 PM

अंधेरीच्या गोखले पूलाचे काम अखेर पूर्ण झाल्याने काल रविवार दि. 16 च्या सकाळ पासून हा पूल अखेरीस वाहतुकीस खुला करण्यात आला.

मनोहर कुंभेजकरमुंबई :1960 च्या सुमारास बांधलेला आणि रेल्वे ट्रॅकवरून जाणारा अंधेरी पश्चिम व पूर्वेला जोडणारा व थेट पश्चिम दृतगती महामार्गापर्यंत जाणारा दुवा म्हणजे अंधेरीचा गोखले पूल. रोज या पुलावरून सुमारे 2.5 ते 3 लाख वाहने ये जा करतात. गेल्या वर्षी 2 जुलैला सकाळी 8च्या सुमारास पावसात या पूलाचा दक्षिणेकडचा पदपथाचा काही भाग पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवरच कोसळल्याने मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी पश्चिम रेल्वेची वाहतूक त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत बंदच होती. तसेच गोखले पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने आणि पूलाचा काही भाग वाहतुकीस खुला करण्यात आला होता. परिणामी या पूल अरुंद झाल्याने गेली वर्षभर अंधेरीकरांना व वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. हा पूल कोसळल्यानंतर या पुलाची जबाबदारी महापालिकेची का रेल्वेची यावरून या दोघांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला होता.

अंधेरीच्या गोखले पूलाचे काम अखेर पूर्ण झाल्याने काल रविवार दि. 16 च्या सकाळ पासून हा पूल अखेरीस वाहतुकीस खुला करण्यात आला. या पुलाच्या कामास सुमारे 3.34 कोटी रुपये खर्च आला आहे. आयआयटी पवईने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले असून या पुलाचा दक्षिणेकडचा पदपथाचा काही भाग कोसळल्याने येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम गेल्या जुलै पासून सुरू करण्यात आले होते. पालिका प्रशासन व रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयातून या पूलाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले.अखेर हा पूल काल पासून वाहतुकीस खुला झाल्याने येथील काही प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली असा विश्वास पालिकेच्या के पश्चिम विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.

याप्रकरणी अंधेरी पश्चिम येथील भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले की, सदर घटना घडल्यापासून ते या पूलाची यशस्वी व मजबूत दुरुस्ती होण्यासाठी आपण पालिका, रेल्वे यांच्याशी पाठपुरावा केला होता. मुंबईतील धोकादायक पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती. पावसाळा तोंडावर आला असतांना अखेरीस हा पूल कालपासून वाहतुकीस खुला झाल्याने अंधेरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.