Join us  

दिलासादायक ! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत तीन हजारने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:06 AM

मुंबई : दोन दिवस वीकेंड लॉकडाऊनमुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला असून, दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत तीन हजारने घट झाली ...

मुंबई : दोन दिवस वीकेंड लॉकडाऊनमुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला असून, दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत तीन हजारने घट झाली आहे. मुंबईत सोमवारी दिवसभरात ६ हजार ९०५ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाख २७ हजार ११९ वर पोहोचला आहे. सोमवारी ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १२ हजार ६० वर पोहोचला आहे. ९ हजार ३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या ४ लाख २३ हजार ६८७ वर पोहोचली आहे.

मुंबईत सध्या ९० हजार २६७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी ३६ दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ८५ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, तर ९१९ इमारतीत रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. दिवसभरात ३९ हजार ३९८ चाचण्या कऱण्यात आल्या असून, आतापर्यंत ४६ लाख ५० हजार १८७ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

बरे होण्याचा दर घसरला

गेल्या एका महिन्याच्या तुलनेत आता ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीत मुंबईचा रिकव्हरी रेट ९३ ते ९५ एवढा होता. फेब्रुवारी महिन्यात मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर होता. १२ मार्चला ९३ टक्क्यांवर गेला; पण आता एप्रिल महिन्यात हा दर कमी होऊन थेट ७९ टक्क्यांवर घसरला आहे. तसेच रुग्ण दुपटीचा कालावधीही ३५ दिवसांवर आला आहे. याशिवाय, ४ ते १० एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर हा १.९३ टक्के इतका झाला आहे.