Join us

उलगडले लावणीचे रंग !

By admin | Updated: January 7, 2015 00:17 IST

बैठकीची लावणी म्हणजे बसून सादर करायची लावणी, खडी लावणी म्हणजे उभ्याने सादर करायची लावणी. दोन्हीच्या अदाकारी वेगवेगळ्या असतात,

मुंबई : बैठकीची लावणी म्हणजे बसून सादर करायची लावणी, खडी लावणी म्हणजे उभ्याने सादर करायची लावणी. दोन्हीच्या अदाकारी वेगवेगळ्या असतात, हे आताच्या मुलींना शिकवायला पाहिजे़ कलेची सेवा करणे म्हणजे काय हे त्यांना सांगायला पाहिजे. आम्ही त्यांना शिकवायला तयार आहोत, पण त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा आणि आम्हा जुन्याजाणत्या लावणी कलावंतांना नवीन पिढीला शिकवायची संधी उपलब्ध करून द्यावी, असे साकडे ८२ वर्षीय लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांनी घातले.शब्दगप्पांच्या कार्यक्रमात सुरुवातीलाच ‘राजसा जवळी जरा बसा’ या लावणीच्या अदाकारीने कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आणि पुढचे दोन-अडीच तास गुलाबबार्इंच्या मुखातून निघणारे लावणीचे शब्द आणि त्यांची थेट काळजाला भिडणारी अदाकारी पाहण्यात रसिक रंगून गेले. संगमनेरला जन्मलेल्या पण खान्देशला कर्मभूमी मानलेल्या गुलाबबार्इंनी बालपणीचा काळ, आईकडून मिळालेले नृत्याचे बाळकडू, त्यानंतर वानूबाई शिर्दीकर आणि गोदावरी पुणेकर यांच्याकडे नृत्याचे धडे कसे गिरवले, तो सगळा काळ रसिकांसमोर उभा केला. गदिमांनी लिहून दिलेली लावणी, पठ्ठे बापुरावांच्या लावण्यांनी गाजवलेला गुलाबबार्इंचा उमेदीचा काळ या वेळी रसिकांसमोर उभा राहिला.बैठकीची लावणी सादर करताना उजव्या पायाने ठेका कसा धरायचा, वादक कसेही आडवेतिडवे वाजवीत असले तरी आपला ठेका पायातील घुंगरांवर कसा तोलून धरायचा, एकच भाव किती वेगवेगळ्या पद्धतीने सादर करायचा, या आणि अशा अनेक कानमंत्राच्या गोष्टी त्यांनी या वेळी प्रात्यक्षिकासहित सांगितल्या. नवीन पिढीला देण्यासारखे अनुभवांचे खूप मोठे गाठोडे आणि कलेचा वारसा माझ्याजवळ आहे; फक्त तो द्यायची संधी मला मिळावी़ ती मिळाली तर हे सगळे मी मुक्त हस्ताने नवीन पिढीला देईन, अशी इच्छाही गुलाबबार्इंनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)