विद्यार्थ्याला बाल न्यायालयाने ठरविले दोषी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मैत्रिणींसोबत मौजमजा, पार्टी करण्यासाठी १७ वर्षीय सीएचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने कॉफी शॉपचे सर्व्हर हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार सायबर पोलिसांच्या चौकशीत समोर आला. विद्यार्थ्याला बाल न्यायालयाने दोषी ठरविले.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अंकित सिंघवी यांच्या कॉफी शॉपच्या गिफ्टकार्डसाठीची जमा असलेली रक्कम दुसऱ्या खात्यात जमा झाल्याचे समजताच त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार सायबर पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला. चौकशीत अंकित यांच्यासह देशभरातील अन्य राज्यांतील ग्राहकांच्या खात्यातूनही अशा प्रकारे पैसे ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. तांत्रिक पुराव्याच्या आधारे पथकाने या विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मैत्रिणींसोबत मौजमजा तसेच पार्टी करण्यासाठी हा प्रताप केल्याचे सांगितले. स्वतःची ओळख लपवून इंटरनेटचा वापर केला. तसेच बनावट सिम कार्डचाही आधार घेतला. यूट्युबवरून त्याने याचे प्रशिक्षण घेतले. याबाबत आरोपपत्र बाल न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्याला दोषी ठरवत, १ वर्षाच्या चांगल्या वर्तवणुकीच्या १५ हजार रुपयांच्या बंधपत्रावर तसेच २ वर्षे संस्थेच्या अधिपत्याखाली समुपदेशन करण्याचे आदेश दिले.
........................