"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 17:20 IST2025-12-07T17:19:37+5:302025-12-07T17:20:02+5:30
विरोधी पक्षनेतेपद द्या, नाहीतर उपमुख्यमंत्रिपद हटवा, या मागणीवरुन उपमुख्ममंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
Eknath Shinde On Uddhav thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला ५ डिसेंबर २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण झाले असले तरी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद न दिल्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. याच मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्रिपद रद्द करण्याची मागणी करत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही मागणी केली. ठाकरे यांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
...तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा!
महायुती सरकारने दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेतेपद अद्याप दिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. "एक वर्ष उलटूनही सरकारने विरोधी पक्षनेतेपद दिलेले नाही. सरकार विरोधी पक्षाला का घाबरत आहे? तुम्ही आम्हाला नियम आणि कायदे दाखवत असाल, तर संविधानात उपमुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तरतूद नसल्यामुळे हे पद तात्काळ रद्द केले पाहिजे," अशी मागणी ठाकरे यांनी केली.
भाजपला लक्ष्य करत उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील शिंदे आणि पवार गटाला अॅनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही, अशी खोचक टीका केली. तिन्ही पक्षांचे नेते एकच असून हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम असल्याचेही ते म्हणाले. ठाकरे यांची उपमुख्यमंत्रिपद रद्द करण्याची मागणी ही अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लक्ष्य करणारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
"काहींना कायमच पोटदुखी"; एकनाथ शिंदेंचा टोला
उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना जोरदार टीका केली. त्यांनी या मागणीला पोटदुखी असे म्हटले. "काही लोकांना अजूनही पोटदुखी आहे. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हाही त्यांना पोटदुखी होती आणि आता मी उपमुख्यमंत्री झालो आहे, तरीही त्यांना पोटदुखी आहे. त्यांची पोटदुखी जाण्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना सुरू केली, पण तरीही त्यांची पोटदुखी जात नाही. आता ते म्हणत आहेत की उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य आहे. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हाही ते मला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत होते," अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
"आताच्या झालेल्या निवडणुकीत तुम्ही घरात बसून राहिलात, बाहेर तर आलाच नाहीत. जेव्हा पत्रकार आम्हाला विचारतात की 'महाविकास आघाडी कुठे आहे?', तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की महाविकास आघाडी घरी बसली आहे'," असे म्हणत शिंदे यांनी ठाकरेंना सणसणीत प्रत्युत्तर दिले.
राज्यात एकीकडे भाजप आणि महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना, विरोधी पक्षनेतेपदावरून सुरू झालेल्या या राजकीय जुगलबंदीमुळे येणाऱ्या काळात विधानसभेचे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.