Join us  

भेंडीबाजारात कपडे, सुरमा अन् अत्तराचा दरवळ, खरेदीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2023 9:05 AM

रस्तोरस्ती गर्दी, रमजाननिमित्त सजला परिसर, परदेशी नागरिकांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहरात साजरे होणाऱ्या सण-उत्सवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते. शहरातील भेंडीबाजार, महंमद अली मार्ग परिसरात रमजाननिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीला उधाण आले आहे. केवळ मुस्लिमधर्मीय नव्हे, तर या गल्ल्यांमध्ये सफर करण्यासाठी दूरहून आलेेले अनेक परदेशी नागरिकही भेट देतात. या गल्ल्यांमधील अत्तर, नवनव्या कपड्यांची फॅशन आणि सुरम्याची वाढणारी विशेष मागणी सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.

रमजाननिमित्त कपडे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांच्या खरेदीला जास्त प्राधान्य दिले जात आहे. यामध्ये लहान मुलांचे ‘चुनोस’, ‘चुस्ती’, बलून, तर मुली व महिलांमध्ये ‘कॉटन चुडीदार’, ‘ख़ुशी पॅटर्न’, तर रमजान महिन्यात हमखास वापरला जाणारा ‘अरबी कुंदरा’, बुरखा इत्यादी कपड्यांची मोठी खरेदी होत आहे. मोठ्या व्यक्तींसाठी सलवार, झब्बा, पठाणी, अरबी, त्याचप्रमाणे जीन्सची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचे दृश्य पाहायला मिळतेय. त्याचप्रमाणे, लहानग्यांसाठी आकर्षक पेहरावही उपलब्ध आहेत.

ईदसाठी महिलांमध्ये मेहंदी काढण्याची परंपरा आहे. त्यामुळे बाजारात मेहंदीच्या कोनलाही मागणी वाढली आहे. या मेहंदी काढण्याच्या पद्धतीत अनेक नव्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्यात तात्पुरत्या काळासाठी टॅटू मेहंदी, गडद लाल अन् काळ्या रंगांच्या मेहंदीचे स्टीकर्स, मेहंदी अधिक आकर्षित करण्यासाठी खडे असे प्रकार उपलब्ध असल्याची माहिती व्यापारी युसुफ शेख यांनी दिली आहे.

या वस्तूंना मागणी- अत्तर, टोपी, सुरमा तसेच इबादत म्हणजेच प्रार्थनेसाठी लागणाऱ्या विविध साहित्याला जास्त मागणी असते. परदेशी बनावटीच्या सुरम्याला रमजानमध्ये आवर्जून मागणी असते. स्त्रिया आणि पुरुषांसाठी निरनिराळ्या प्रकारचा सुरमा, अत्तरही आहेत. कपडे, दागिने, चपलांव्यतिरिक्त चादरी, स्कार्फस यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

टॅग्स :मुंबईरमजान