Close the pedestrian pool at Kurla station | कुर्ला स्थानकावरील पादचारी पूल बंद
कुर्ला स्थानकावरील पादचारी पूल बंद

मुंबई : कुर्ला स्थानकावरील घाटकोपर दिशेकडील पूर्व-पश्चिम जोडणारा पादचारी पूल मध्य रेल्वे प्रशासनाने दुरुस्ती करण्यासाठी बंद केला आहे. यामुळे पुलावर गर्दीचा ताण वाढला़ मंगळवारी प्रवाशांना पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी गर्दीला सामोरे जावे लागले.
कुर्ला स्थानकावरील इतर पर्यायी पादचारी पुलाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या पादचारी पुलावर गर्दीचा भार वाढून कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता आहे. कुुर्ला स्थानकाच्याजवळ पूर्व-पश्चिम जोडणारा भुयारी पादचारी मार्ग दुरावस्थेत आहे. येथील विद्युत दिवे बिघडलेले आहे. भुयारी मार्गात गर्दुल्ल्यांनी उच्छांद मांडला आहे. या भुयारी मार्गात अस्वच्छ मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रवाशांना येथून ये-जा करणे जिकरीचे आहे. कुर्ला स्थानकावरील घाटकोपर दिशेकडील पादचारी पूल बंद केला, मात्र पर्यायी पुलाची अवस्था अशाच प्रकारची असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

अंधेरी येथील गोखले पूलाची दुर्घटना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील जोड पादचारी पूल कोसळण्याची घटना घडल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल दुरुस्ती करण्याच्या कामाला वेग दिला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड आणि सांताक्रुझ या स्थानकादरम्यान असलेला खार सबवे तात्पुरता बंद करण्यात येणार आहे. ३ एप्रिल ते ७ एप्रिलपर्यंत रात्री १२ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत सबवे बंद ठेवण्यात येणार आहे.

क्लिप पट्टीवर पुलाचा भार
कुर्ला स्थानकावरील पादचारी पुल धोकादायक असल्याने मंगळवारपासून बंद करण्यात आला. हा पूल पडू नये, यासाठी पादचारी पुलाला क्लिपच्या पट्टीने बांधून ठेवण्यात आला आहे. या क्लिपची पट्टी किती काळ पादचारी पुलाचा भार धरून
ठेवेल ? अशा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.


Web Title:  Close the pedestrian pool at Kurla station
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.