Join us  

रेल्वेमार्गांवरील झाडांचा अडसर दूर २,४२४ झाडांच्या छाटणीसाठी परवानगी : ५० टक्के काम पूर्ण

By जयंत होवाळ | Published: May 07, 2024 7:55 PM

यातील ५० टक्क्यांहून अधिक झाडांची छाटणी पूर्ण करण्यात आली आहे.

मुंबई: पावसाळापूर्व खबरदारी म्हणून उपनगरी रेल्वेमार्गांलगत असलेल्या झाडांच्या छाटणीला देखील गती देण्यात आली आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गालगत ५२ ठिकाणी मिळून एकूण २ हजार ४२४ झाडांची छाटणी करणे गरजेचे आहे. यातील ५० टक्क्यांहून अधिक झाडांची छाटणी पूर्ण करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे रुळांलगत धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांची छाटणी करण्यात येत आहे. सर्वेक्षणानुसार या तीन रेल्वेमार्गांलगत २ हजार ४२४ झाडांच्या छाटणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यातील पश्चिम रेल्वे रुळालगतची ३४, मध्ये रेल्वेलगतची १६ आणि हार्बर रेल्वेमार्गालगतची २ अशा एकूण ५२ ठिकाणच्या झाडांच्या छाटणीसाठी परवानगी दिली आहे. या ठिकाणी असलेल्या एकूण २ हजार ४२४ पैकी निम्म्याहून अधिक झाडांची छाटणी झाली आहे. घाटकोपर, विद्याविहार, वडाळा आदी परिसरातील रेल्वे रुळालगतच्या झाडांची छाटणी सुरू आहे.

मुंबईतील ३८,५७४ झाडांची छाटणी पूर्णमुंबईत आतापर्यंत ३८ हजार ५७४ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. खासगी तसेच शासकीय मालकीच्या परिसरामधील झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासंदर्भात ७ हजार ३४ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. एकूण झाडांपैकी १ लाख ८६ हजार २४६ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. त्यापैकी १ लाख १४ हजार ३३७ हजार झाडांची छाटणी अपेक्षित आहे. ३ मेपर्यंत ३८ हजार ५७४ झाडांची छाटणी झाली आहे. ७ जूनपर्यंत उर्वरित झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे. मृत आणि कीड लागलेली, तसेच वाकलेली ५०२ झाडे सर्वेक्षणादरम्यान आढळली आहेत. यापैकी ४८२ झाडे काढून टाकण्यात आली असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी सांगितले.

प्रशासनाशी संपर्क साधा

गृहनिर्माण सहकारी संस्था, शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.

टॅग्स :मुंबईलोकल