नामदेव मोरे / नवी मुंबईअमली पदार्थविरोधी पथकाच्या धडक मोहिमेनंतरही शहरात खुलेआम गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. टारझन, अशोक पांडे गजाआड झाल्यानंतर त्यांच्या जागी इतर तस्करांनी व्यवसाय सुरू केले आहेत. कोपरीजवळील स्मशानभूमीमध्ये गांजाची लागवड केली आहे. तरुणाईला अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढले जात असून, या आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी केली जात आहे. ‘लोकमत’ने जून २०१६पासून अमली पदार्थविरोधी मोहीम सुरू केली आहे. दोन वेळा स्टिंग आॅपरेशन करून शहरातील गांजा व इतर अमली पदार्थविक्रेत्यांच्या अड्ड्यांवर पोलिसांचे लक्ष केंद्रित केले होते. अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, निरीक्षक माया मोरे, उपनिरीक्षक अमित शेलार, राणी काळे व त्यांच्या पथकाने सहा महिन्यांमध्ये २३ गुन्हे दाखल करून, तब्बल ३५ आरोपींना गजाआड केले आहे. नवीन वर्षामध्ये कोपरखैरणेत पूनम अॅन्थोनी वाझ या महिलेला अटक करून तिच्याकडून चरससह १ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. आयुक्तालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाईझाली असली, तरी अद्याप पूर्ण नवी मुंबई अमली पदार्थमुक्त होऊ शकली नाही. शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीचे स्वरूप समजून घेण्यासाठी ‘लोकमत’च्या टिमने एपीएमसी, तुर्भे, कोपरी परिसरात स्टिंग आॅपरेशन केले असता, अनेक ठिकाणी खुलेआम गांजाविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. धान्य मार्केटसमोरील झोपडपट्टीमधील अड्डा वर्षभरामध्ये कधीच बंद झालेला नाही. या झोपडीमध्ये गांजाविक्री करणाऱ्यांच्या टोळीमध्ये एकाच परिवारातील २० ते २५ जणांचा समावेश आहे. एक तुरुंगात गेला की, दुसरा व्यवसाय सुरू करतो. यांचे वास्तव्य झोपडीत असले, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी त्यांचे फ्लॅट असल्याचे बोलले जात आहे. आमचा अड्डा कोणी व कधीच बंद करू शकत नाही, असे आव्हान येथील गांजाविक्रेत्या महिला देऊ लागल्या आहेत. कोपरी गावाजवळ एक स्मशानभूमीमध्ये तेथील देखभाल पाहणाऱ्या कर्मचाऱ्याने गांजाची लागवड केली आहे. एक वर्षापासून बिनधास्तपणे गांजाची शेती सुरू आहे. स्मशानामध्ये पोलीस तपास करायला जात नाहीत व संशयही घेत नाहीत, यामुळे संबंधिताने हे धाडस केले आहे. या शेतीची चर्चा एपीएमसी, तुर्भे, सानपाडा परिसरात नागरिक अनेक वेळा करत असून, त्याची माहिती पोलिसांना कशी नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. एपीएमसी परिसरातील एक सुलभ शौचालयाबाहेरील रिक्षा व टॅक्सी स्टँड गांजा ओढणारांचा अड्डा झाला आहे. दिवसभर येथे धूम्रपान व मद्यपान सुरू असते. याशिवाय फळमार्केटमध्ये पप्पू, तुंडा, तुर्भे नाक्यावर उत्तम रिक्षावाला, नेरूळ बालाजी मंदिराच्या पायथ्याशी अंटी व इतर अनेक ठिकाणी गांजाविक्री सुरू असून, या सर्वांवर मोक्का लावण्याची मागणी होत आहे. पोलिसांना उघड आव्हानच्एपीएमसीच्या धान्यमार्केट समोरील झोपडीमध्ये शहरातील सर्वात मोठा गांजाविक्रीचा अड्डा सुरू आहे. या अड्ड्यावर पोलिसांनी अनेक वेळा धाडी टाकून, विक्रेत्यांवर कारवाई केली आहे; पण गांजाविक्री करणाऱ्यांच्या परिवारामध्ये २० ते २५ सदस्य आहेत. एकाला अटक झाली की, दुसरी व्यक्ती अड्डा सुरू करते. काही पोलीस कर्मचारीही त्यांना पाठीशी घालत आहेत. यामुळे कितीही कारवाई करा, आमचा अड्डा बंद होणार नसल्याचे उघड आव्हान देऊ लागले असून, पोलीस हा अड्डा कायमस्वरूपी बंद करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोऱ्याची रिक्षा गँग च्कांदा मार्केटच्या भिंतीला लागून सुलभ शौचालयासमोर गांजा ओढणाऱ्यांची मैफील सुरू असते. येथे अनधिकृतपणे रिक्षा स्टँड सुरू झाले आहे. यापूर्वी एमडी पावडर विक्रीप्रकरणी अटक झालेला गोऱ्या नावाची व्यक्ती रिक्षावाल्यांना गांजापुरवठा करत आहे. काही रिक्षाचालकांना त्याने विक्रेते बनविले असून, त्यांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू ठेवला असल्याची चर्चा आहे. दिवसभर या रिक्षास्थानकामध्ये जुगार, मद्यपान व गांजा ओढणारांची गर्दी असल्याचे निदर्शनास आले आहे. च्कोपरी गावच्या जवळ लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीमध्ये तेथील देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याने गांजाच्या रोपांची लागवड केली आहे. बाहेर गांजा मिळणे बंद झाले, तर येथील गांजाचा वापर धूम्रपानासाठी केला जात आहे. स्मशानामध्ये गेलेल्या काही दक्ष नागरिकांनी ही गोष्ट ‘लोकमत’च्या निदर्शनास आणून दिली. तेथे जाऊन पाहणी केली असता, गेटच्या समोरच गांजाची रोपे लावलेली निदर्शनास आली. या गांजा शेतीचीही पोलिसांना माहिती नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. उत्तम रिक्षावालाच्तुर्भे नाक्यावर उत्तम रिक्षावाला गांजाविक्रीचा व्यवसाय करत आहे. नवी मुंबईमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई सुरू असल्याने तो मुंबईमधून गांजा घेऊन येतो. काही दिवसांपूर्वी रबाळे परिसरात एक किलो गांजासह त्याला पकडले होते; पण गुटखामाफिया राख्या गुप्ताने त्याची ३० हजारांत मांडवली करून दिल्याची चर्चा खुलेआम सुरू आहे. याशिवाय नेरूळ बालाजी टेकडीच्या पायथ्याशीही गांजाविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तुंडा, पप्याचे फळ मार्केटमध्ये बस्तान च्एपीएमसीतील फळबाजारामध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये काम करणाऱ्या तुंडा व पप्या या दोघांनी गांजाविक्रीचा अड्डा सुरू केला असून मार्केट व इंदिरानगर, बोनसरी परिसरात गांजाची विक्री करतात. दोघेही गांजा तस्करीच्या टोळीत असल्याचे माहिती असूनही एपीएमसी प्रशासन त्यांना अभय देत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे व मार्केटमध्ये येण्यास बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
शहरात अमली पदार्थांची तस्करी सुरूच
By admin | Updated: January 9, 2017 06:45 IST