श्री सदस्यांची स्वच्छता मोहिम : निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मदिन
अलिबाग : राष्ट्रपे्रमाची आणि राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण आपल्या निरुपणाच्या माध्यमातून सातत्याने देवून प्रबोधन घडवून आणणारे ज्येष्ठ समाजसुधारक आणि ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनी मातृदिनाचे आगळे औचित्य साधण्यात आले. तब्बल ६३ हजारहून अधिक श्री सदस्यांनी देशातील ४० शहरातील तब्बल ३ हजार ३५० किमी अंतराच्या रस्त्यांच्या दुतर्फा स्वकष्टाने स्वच्छता मोहिम यशस्वी करुन, आपल्या सद्गुरुंना अभिवादन करुन, त्यांचे समाज प्रबोधन वास्तवात उतरवून, देशातील सर्वात मोठ्या स्वच्छता मोहिमेचा विक्रम केला आहे. अलिबागचे राजे आणि आरमार प्रमुख सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी समाजप्रबोधानाचे व्रत स्वीकारलेल्या तत्कालीन रेवदंड्याच्या ‘शांडिल्य’ कुटुंबास ‘धर्माधिकारी’ ही पदवी बहाल करुन त्यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यास सर्वप्रथम राजमान्यता दिली आणि तेव्हापासून हे शांडील्य कुटुंब ‘धर्माधिकारी’ म्हणून ओळखले जावू लागले. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी याच निरुपणातून समाज प्रबोधनाचा वारसा आपले पिता ज्येष्ठ निरुपणकार डॉ.श्री.नारायण विष्णू उपाख्य नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून घेतला आणि पुढे अखंड सुरु ठेवला आहे. आज डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा या संस्थेच्या माध्यमातून, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले तर हजारो श्री सदस्यांनी सक्रिय सहभागी होवून ही स्वच्छता मोहिम देशात राबवली. अस्वच्छता आणि पर्यावरण ºहासासारखे मोठे धोके असून ते आपणच निर्माण कलेले आहेत. त्याचे विपरित परिणाम आपल्याच पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतील. ही गंभीर परिस्थिती आपल्यावर येवू नये या करिता आपल्या भारत मातेचे अंतर्गत संरक्षण अत्यंत महत्वाचे आहे, अशी शिकवण आजच्या दिवशी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिली आहे. आपला समाज म्हणजे एक कुटुंब आहे. आपण आपले घर स्वच्छ ठेवण्याचा सतत प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मतेची भावना स्वयंशिस्तीने अंगीकारुन, आपले गाव, आपले शहर आपणच स्वच्छ ठेवले तर आपला देश नेटका राहील, असा विश्वास ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी गावे, शहरे, समुद्र किनारे, रस्ते, हमरस्ते स्वच्छ झाले आणि तप्त उन्हातही भारतमाता सुखावली... स्वच्छता कायम राखण्याच्या निर्धाराने मोहिमेची सांगता झाली. (विशेष प्रतिनिधी)