Join us  

ध्वनी आणि वायू प्रदूषणानेही भरले शहर, उपनगरातील रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 2:31 AM

एमएमआरडीएतर्फे सांताक्रूझ पश्चिमेकडे फ्लायओव्हरचे काम सुरु असून, मुंबई महापालिकेतर्फे ठिकठिकाणी रस्त्याच्या खोदकामाची तर रस्ते दुरुस्तीची कामे सुरु आहेत.

सचिन लुंगसे

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबई महापालिका या प्राधिकरणांतर्फे मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी सातत्याने काही ना काही कामे सुरु असतात. आजघडीला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे काम सुरु असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पश्चिम द्रुतगती मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे.

एमएमआरडीएतर्फे सांताक्रूझ पश्चिमेकडे फ्लायओव्हरचे काम सुरु असून, मुंबई महापालिकेतर्फे ठिकठिकाणी रस्त्याच्या खोदकामाची तर रस्ते दुरुस्तीची कामे सुरु आहेत. विकास कामादरम्यान खोदकामासाठी वापरली जाणारी यंत्रे सातत्याने ध्वनी प्रदूषण करत असून, मेट्रो-३ च्या कामामुळे दक्षिण मुंबईतील फोर्ट, महालक्ष्मी, वरळी, दादर, माहीम आणि मरोळ येथील नागरिकांची ध्वनी प्रदूषणाने झोप उडाली आहे. येथील ध्वनी प्रदूषणावरून न्यायालयानेही प्राधिकरणास फटकारले असून, रात्रीच्या वेळी ध्वनी प्रदूषण करणारे काम होणार नाही; याची खबरदारी संबंधित प्राधिकरणाने घेतली आहे. प्रत्यक्षात न्यायालयाने फटकारल्याने प्राधिकरणांनी याची काळजी घेतली. मात्र उपनगरात सुरु असलेल्या कामांमुळे ध्वनीसह होणारे वायू प्रदूषण कायम आहे. मरोळ नाका येथे मेट्रोच्या कामामुळे उठणारी धूळ येथील वातावरणात धूळीकणांची भर घालत आहे. सांताक्रूझ पश्चिमेकडील सुरु असलेल्या फ्लायओव्हरच्या कामामुळे उठणारी धूळ येथील वायू प्रदूषणात भर घालत आहे. भांडूप आणि मुलुंड येथील एलबीएस मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती ध्वनी आणि वायू प्रदूषण करत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि एमएमआरडीएच्या तुलनेत मुंबई महापालिकेची कामे अधिक सुरु आहेत. त्यांची संख्याही अधिक आहे. विशेषत: रस्त्यांची दुरुस्ती अथवा रस्ते नवे बनविताना उठणारी धूळ वाहनचालकांच्या नाकी नऊ आणत आहे. रस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी ही समस्या कायमच असून, उठत असलेल्या धूळीमुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी होत आहे.प्रशासनाचे दुर्लक्षच्धूळ उठू नये म्हणून खोदकाम करताना, रस्त्याची दुरुस्ती करताना, रस्ते बांधताना, फ्लायओव्हर बांधताना; या कामांची ठिकाणी पाणी मारणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी केली जात नाही. किंवा अंमलबजावणी केली तरी उठणारी धूळ आणि त्याचे प्रमाण असहय असल्याने रहिदारी कमी असेल तेव्हा काम करण्यावर भर दिला पाहिजे. प्रशासन कशावरच लक्ष केंद्रित करत नाही.

टॅग्स :मुंबई