Join us  

Children's Day 2019: ‘लोकमत बच्चा पार्टी’ उपक्रमाला भरभरून प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 5:57 AM

‘लहान मनी मोठा ध्यास’ हे ब्रीदवाक्य घेऊन आरंभ झालेल्या ‘लोकमत बच्चा पार्टी’ या उपक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई : ‘लहान मनी मोठा ध्यास’ हे ब्रीदवाक्य घेऊन आरंभ झालेल्या ‘लोकमत बच्चा पार्टी’ या उपक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. विविध ठिकाणांहून लाखो लहानग्यांनी शासनकर्त्यांना प्रश्न विचारत आपली स्वप्नही लिहून पाठविली आहेत. या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) बालदिनानिमित्त राज्यातील पुणे, सोलापूर, नाशिक आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांत ही बच्चा पार्टी शासनकर्त्यांची भेट घेणार आहे.अनेक लहानग्यांनी ‘बच्चा पार्टी’चे सदस्य होण्याकरिता त्यांचे प्रश्न विचारले आहेत. लहानग्यांचे ‘मोठे’ अनुरूप प्रश्न पाहून आम्हीदेखील थक्क झालो. वर्धा जिल्ह्यातील विधी रानडेने राजकीय पक्षांच्या भांडणांवर विरोध व्यक्त केला आहे. ‘मोठे लोक असे भांडले, तर आमच्या लहान मुलांपुढे काय आदर्श राहाणार?’ असा रोखठोक प्रश्न तिने उपस्थित केला आहे.औरंगाबादच्या चिमुरड्या ऐश्वर्या बोरडे हिने प्रदूषणाची समस्या अचूक ओळखली आहे. ‘राजधानी दिल्ली प्रदूषित अवस्थेत आहे, उद्या ही अवस्था आपल्या शहराची पण होणार का?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.प्रज्ज्वल संजय अतुल या सातवीत शिकणाºया विद्यार्थ्याने ‘भविष्यात मोठा नेता’ व्हायचे असल्याचे सांगितले. आपल्या शहराबद्दल लिहिताना तो म्हणतो की, आपले शहर इतर विलायती शहरांसारखे स्वच्छ सुंदर झाले पाहिजे, असे अनेकांना वाटते, पण नुसतेच स्वच्छ, सुंदर, आधुनिक शहर झाले पाहिजे, असा विचार करून फायदा नाही, तर आपल्याला त्याच्याविषयी जागरूक राहायला पाहिजे. त्यासाठी आपण स्वत: घर तसेच घराबाहेर कुठेही कचरा करणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्यासमोर जर कोणी कचरा टाकत असेल, त्याला कचराकुंडीचा वापर करायला सांगितले पाहिजे. शहरातील सर्व लोकांनी असे केले, तर नक्कीच आपले शहर माझ्या स्वप्नातील शहराप्रमाणे दिसेल.>असे आहेत लहानग्यांचे ‘मोठे’ प्रश्नशहरात रात्री खेडेगावासारखे चांदणे का दिसत नाहीत?, पूर्वीसारख्या नद्या स्वच्छ का नाहीत?, सध्या शहरातील लोक तोंडाला मास्क घालून का फिरत आहेत?, पूर्वीसारख्या जमिनी सुपीक का नाहीत?, खेड्यातील लोक शहरांच्या लोकांपेक्षा सुदृढ का असतात?, आकाशात पक्ष्यांचा मोठा थवा का दिसत नाही?, आपले शहर स्वच्छ कधी होणार आहे? आणि आपल्या शहरात झाडांची किती संख्या आहे? अशा प्रकारे शहर, पर्यावरण, राजकारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रांविषयी लहानग्यांनी प्रश्न पाठविले आहेत.>तुम्ही आहात का तयार आमच्या बरोबर जोडून घेण्यासाठी ? महाराष्ट्रातील सर्व मुलांना यासाठी जाहीर आमंत्रण आहे. त्वरित तुमचे प्रश्न, तुमच्या भविष्याबद्दलच्या अपेक्षा, शहराबद्दलचे स्वप्न - आम्हाला पाठवा ८१०८४६९४०७ या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करा किंवा brandpartner@lokmat.com वर लिहून कळवा.