मुंबई : आॅक्टोबर हीटचे चटके सहन करणाऱ्या मुंबईकरांना अजूनही गुलाबी थंडीचा अनुभव घेता आलेला नाही. रात्री काही प्रमाणात तापमान कमी होते, मात्र दिवसा तापमानाचा पारा चढलेला असतो. या विषम तापमानामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. कडक ऊन आणि थंड हवा असे वातावरण डासांची पैदास होण्यास पोषक असते. यामुळेच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसागणीक वाढताना दिसत आहे. या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांनीही मुंबईत जोर धरलेला आहे. लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दुपारी जास्त आणि रात्री कमी होणाऱ्या तापमानामुळे लहान मुलांना ताप येतो. यामुळे लहान मुलांना वेळच्या वेळी सकस आहार आवश्यक आहे. ज्यामुळे मुले आजारी पडणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुंबईमध्ये गेल्या ३० ते ४० वर्षांपूर्वी अशा प्रकारचे विषम तापमान नव्हते. सम तापमान असल्यास त्याचा त्रास आरोग्यास होत नाही, असे ज्येष्ठ फिजिशियन डॉ. सुहास पिंगळे यांनी सांगितले. कडक उन्हात घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. उन्हामध्ये फिरल्यास थकवा जाणवतो. या काळात द्रव पदार्थांचे सेवन केले पाहिजे. उन्हात फिरताना शरीरातील पाणी कमी होत असल्यामुळे शहाळ््याचे पाणी, लिंबू सरबत, साखर पाणी घेतले पाहिजे. ताप आला, सर्दी, खोकला झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतले पाहिजे, असे डॉ. पिंगळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुले आणि ज्येष्ठांना आजारांनी ग्रासले
By admin | Updated: November 10, 2014 01:43 IST