Join us  

नारायण राणेंच्या प्रवेशासाठी मुख्यमंत्री अनुकूल, मध्यस्थीची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर

By अतुल कुलकर्णी | Published: August 23, 2017 1:35 AM

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपामध्ये यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असून या कामी मध्यस्थीची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. राणेंसारखा नेता भाजपात येण्याचे अनेक राजकीय लाभ यानिमित्ताने मिळणार असल्यानेच यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे भाजपामधील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.राणे भाजपात येण्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा मेसेज जाईल, आधीच कमकुवत झालेली काँग्रेस यामुळे आणखी खिळखिळी होईल. त्यांच्यासोबत आ. नितेश राणे आणि आ. कालिदास कोळंबकर राजीनामे देऊन भाजपात येतील. परिणामी, विधानसभेतील काँग्रेसचे विरोधीपक्ष नेतेपदही जाईल. त्या दोघांना निवडून आणण्याही हमी स्वत: मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचेही तो नेता म्हणाला. विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपात जाण्यास उत्सूक असून ते विरोधीपक्ष नेते पदावर असतानाच त्यांनी भाजपात यावे यासाठी प्रयत्न केले गेले पण त्याला गती मिळाली नाही. काँग्रेसचा विरोधी पक्ष नेताच आमच्याकडे येतो असे चित्र त्यातून निर्माण करण्याकडे भाजपाचा कल आहे. राणे व विखे भाजपात आले तर फडणवीस यांची राजकीय उंची वाढेल, असेही तो नेता म्हणाला.याआधी राणे यांनी भाजपात यावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते. पण तेव्हा फडणवीस यांनी फारशी अनुकूलता दर्शविली नव्हती, कारण राणेंसारखा नेता कोणामुळे भाजपात येतो हा प्रश्नही तेवढाच महत्वाचा होता. त्यावेळी सिंधुदूर्ग लोकसभेची जागा निलेशसाठी देतो असा शब्द राणेंना हवा होता. तर तुम्ही आधी पक्षात या, बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील असा गडकरींचा सूर होता. त्यामुळे त्या चर्चेतून काही निष्पन्न झाले नाही. पुढे राणे प्रवेशाची सूत्रे स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे घेतली. त्यांनीच पुढाकार घेऊन राणे यांना अहमदाबादला घेऊन गेले होते असेही तो नेता म्हणाला.महसूलमंत्री पाटील व राणे यांच्या बैठका ही झाल्या. गेल्या आठवड्यात राणे प्रवेशाच्या बातम्या सुरु झाल्यानंतर पाटील यांनी अधिकृतपणे त्यांच्यासाठी बांधकाम खाते देण्यास आपण तयार असल्याचेही जाहीर करुन टाकले. त्यामागे ही सगळी पार्श्वभूमी होती.गटनेतेपद देण्यास चव्हाण अनुत्सुकराणे यांनी पक्ष सोडण्याची भूमिका का घेतली? याची काँग्रेसमध्ये अनेक कारणे सांगितली जातात. सरकारच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. पक्षाला नेमके भवितव्य काय, याविषयी कोणतेही स्पष्ट चित्र नाही, सरकारच्या विरोधात रणनीती ठरवून लढायचे तर त्यासाठी कोणी भूमिका घेण्यास तयार नाही.या विधानपरिषदेत सेवा ज्येष्ठतेनुसार राणे यांना काँग्रेसने गटनेते करावे यासाठी किमान तीनवेळा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत बैठका झाल्या. शरद रणपिसे यांना गटनेतेपदावरुन दूर करुन हे पद राणे यांना देण्यास चव्हाणउत्सूक नाहीत.त्यामुळे विधानपरिषदेत कोणत्याही विषयावर बोलताना आधी विरोधीपक्ष नेते बोलणार, नंतर गटनेते म्हणून रणपिसे, मधेच भाई जगताप बोलणार आणि त्यानंतर मी बोलायचे का? असा प्रश्नही राणे यांनी अशोक चव्हाण यांना विचारला. पण त्यावर पुढे काहीच झाले नाही. ही घुसमट करुन घेण्यापेक्षा भाजपात सन्मानाने जायला काय हरकत आहे, असा विचार राणे यांच्या गोटात बळावत चालल्याचे राणे समर्थक आमदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :नारायण राणे