Changes in the habitat of birds in the arena | आरेमधील पक्ष्यांच्या अधिवासात होतोय बदल
आरेमधील पक्ष्यांच्या अधिवासात होतोय बदल

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीमध्ये पक्ष्यांच्या जवळपास १३६ प्रजाती असून त्यातील ६० प्रजाती स्थलांतरित पक्ष्यांच्या तर स्थानिक पक्ष्यांच्या ८० प्रजाती दिसून येतात. आरेमध्ये गवताळ, जंगल, डोंगराळ, शेती तसेच ओशिवरा व मिठी नदीचे पात्र आहे. आरेच्या जंगलात स्थानिक व स्थलांतरित पक्षी अशा दोन गटांतील पक्षी मोठ्या संख्येने निदर्शनास येतात. पण विकास प्रकल्पांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे येथील पक्ष्यांच्या अधिवासात बदल होत असल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.
आरेमध्ये राष्ट्रीय पक्षी मोर आणि राज्य पक्षी हरियाल यांचे थवे पाहायला मिळतात. आरेत एकवेळच्या मॉर्निंग वॉकमध्ये ६० ते ७० विविध प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात. पण सध्या विकासकामांमुळे जंगले नष्ट होत आहेत. त्यामुळे झाडांची कत्तल झाल्याने जे पक्षी फुलांवर व फळांवर अवलंबून आहेत, ते निश्चित कमी होत आहेत. ज्या ठिकाणी झाडांची लागवड करण्यात आली आहे ती मोठी होईपर्यंत इथले बहुतेक पक्षी दूर निघून गेलेले असतील. वृक्षतोडीमुळे पक्ष्यांची घरटी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, मोठ्या पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी मुंबईत मोठी झाडेच शिल्लक राहिलेली नाहीत.
>आरेमध्ये वेगवेगळ्या प्रजातींच्या घारीचे थवे उडताना दिसतात. तसेच हिवाळ्यात काश्मिरी घारीही स्थलांतरित होऊन येतात आणि याचबरोबर कापसी घारसुद्धा दिसून येते. विविध प्रजातींचे घुबड, स्वर्गीय नर्तक, फ्लाय कॅचरच्या सात प्रजाती येथे आढळून येतात. याशिवाय डॉ. सलिम अली बर्डसुद्धा दिसतात. आरेतील पाणथळ क्षेत्रात किंगफिशर, पाणकोंबडी इत्यादी पक्षी नजरेस पडतात. नाइट हेरन हा पक्षीही आपले घरटे बांधताना निदर्शनास आला होता. याशिवाय चार ते पाच प्रजातींचे ई-ग्रेटस् व त्यांची घरटी निदर्शनास आली आहेत. त्याचबरोबर नाईट जार हा निशाचर पक्षीही बघण्यात आला. संकटग्रस्त होत चाललेले ग्रे हॉर्नबिल पक्ष्यांचे थवेही पाहण्यात आले आहेत.
- आनंद पेंढारकर, वन्यजीव शास्त्रज्ञ

Web Title: Changes in the habitat of birds in the arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.