Join us  

चंद्रशेखर रावण आजाद यांची सभा जांबोरी मैदानावरच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 3:13 PM

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर ही भीम आर्मी सभेवर ठाम

मुंबई : भीम आर्मी चे संस्थापक प्रमुख चंद्रशेखर रावण आजाद यांच्या २९ डिसेंबर रोजी वरळीतील जांबोरी मैदान येथे होणाऱ्या सभेस वरळी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, पोलिसांना फक्त ध्वनिक्षेपकास परवानगी देण्याचा अधिकार असून 29 डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता जांबोरी मैदानावर सभा होणारच असा पवित्रा भीम आर्मी घेतला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी ही माहिती दिली.

कांबळे यांनी सांगितले की, या सभेसाठी भीम आर्मीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 30 नोव्हेंबर रोजी मैदानाची परवानगी मिळवली आहे. मैदानाचे शुल्कही भीम आर्मीने अदा केलेले आहे. तसेच ध्वनिक्षेपकाच्या परवानगीसाठी वरळी पोलिसांना २ डिसेंबर रोजी अर्ज करण्यात आला होता. मात्र, पोलिसांकडून परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने २० डिसेंबर रोजी भीम आर्मीने पोलिसांना स्मरणपत्र दिले. त्यानंतर २१ डिसेंबरला वरळी पोलीस ठाण्यातून परवानगी संदर्भात संपर्क साधण्यात आला. २२ डिसेंबरला पोलीस ठाण्यात गेले असता कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे पत्र भीम आर्मीला दिले. त्यामुळे सरकार भीम आर्मीचा आवाज दडपू पाहत असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.

यासाठी प्रमाणेच ३० डिसेंबरला पुणे येथे, २ डिसेंबरला लातूरला आणि ४ डिसेंबरला अमरावती येथे आझाद यांची जाहीर सभा होणार आहे. यातील लातूर येथील परवानगी वगळता पुणे व अमरावती येथेही मैदानाची परवानगी मिळाल्यानंतर ही पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात येत आहे. संविधानाबाबत भाष्य करणाऱ्या आजाद यांच्यासह दलित समाजाचा आवाज भाजपाकडून दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे. तसेच कितीही दबावतंत्र वापरले तरीही आजा त्यांच्या नियोजित दौरा प्रमाणे सर्व सभा कोणत्याही परिस्थितीत पार पडतील असा दावाही भीम आर्मी ने केला आहे.