गौरीशंकर घाळे, मुंबईपश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. एकीकडे स्वच्छ प्रतिमेचा, तळागाळात जनसंपर्क असणारा विद्यमान आमदार, तर दुसरीकडे त्याच तोडीचे विरोधक. लोकसभेच्या दृष्टीने अंधेरीचा पश्चिमचा समावेश उत्तर-पश्चिम मतदारसंघात होतो. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा लढतीत शिवसेनेचे गजानज कीर्तिकर येथून विजयी झाले. विशेष म्हणजे अंधेरी पश्चिमेतून त्यांना तब्बल २९ हजार मतांची आघाडी मिळाली. महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली ही आघाडी मोडून काढण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर असणार आहे. २००९ साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अंधेरी पश्चिम मतदारसंघ अस्तित्वात आला. जुहू, अंधेरी स्टेशन परिसर, सात बंगला - वर्सोवा लिंक रोड, कपासवाडी, जुहू गल्ली, इर्ला परिसराचा या मतदारसंघात समावेश होतो. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अशोक जाधव यांनी येथून तब्बल ३२ हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. अशोक जाधव यांना एकूण ५९ हजार ८९९ मते मिळाली. शिवसेना उमेदवार विष्णू कोरगावकरांना मात्र अवघ्या २७ हजार मतांवर समाधान मानावे लागले. मनसे उमेदवार रईस लष्करीया यांनी १८ हजार मते घेत तिसरे स्थान मिळवले. स्वच्छ प्रतिमा आणि तळागाळातील कार्यकर्ता अशी अशोक जाधव यांची प्रतिमा आहे. अगदी स्थानिक स्तरावरून काम सुरू करत जाधव यांनी आमदारकीपर्यंतचा प्रवास केला. २००४ साली विलेपार्ले मतदारसंघातून शिवसेना नेते विनायक राऊत यांचा पराभव करत त्यांनी पहिल्यांदा विधिमंडळात प्रवेश केला. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यांनी २००९ साली अंधेरीतून निवडणूक लढवित सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. मतदारसंघातील विविध घटकांपर्यंत थेट संपर्क असणाऱ्या अशोक जाधवांच्या संपर्क कार्यालयातील जनतेचा राबता त्याची साक्ष देतो. इर्ला येथे छोटेखानी जागेत असणाऱ्या त्यांच्या कार्यालयातील गर्दी त्यांच्या राजकारणाचा बाज दाखवून देते. काँग्रेसकडून अशोक जाधवांचे नाव जवळपास निश्चित मानण्यात येत आहे. तरीही, मोहसीन हैदर व ज्योत्स्ना दिघे यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला आहे. गेल्या निवडणुकीत उमेदवार निवडीत घातलेल्या गोंधळामुळे अनेक ठिकाणी विशेषत: मुंबईत शिवसेनेला फटका बसला. अंधेरीत विष्णू कोरगावकरांना दिलेली उमेदवारी याच सदरात मोडणारी होती. स्थानिक पातळीवर पक्षसंघटन मजबूत असतानाही मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. अंधेरी व डी.एन. नगर परिसरात दबदबा असणारे जयवंत परब यांनी दोनच वर्षांपूर्वी ‘गृहप्रवेश’ केल्याने शिवसेनेची दुबळी बाजू सावरली गेली आहे. नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. लोकांची कामे झटपट उरकण्यात त्यांचा हातखंडा आहे. उपविभाग प्रमुख सुनील दळवीदेखील येथून इच्छुक आहेत. उत्तर-पश्चिम मतदारसंघातील एकही विधानसभेची जागा भाजपाकडे नाही. सर्व सहा जागांवर शिवसेना आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजपालाही येथून प्रतिनिधित्व मिळावे, अशी भाजपाची भूमिका आहे. अंधेरी पश्चिमेत निवडणूक जिंकू शकतील असे सक्षम उमेदवार असल्याने भाजपा या जागेसाठी आग्रही आहे. सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांतून स्वत:चे स्थान निर्माण करणारे अमित साटम भाजपातून प्रबळ दावेदार आहेत. तर, दिलीप पटेलही चांगला पर्याय ठरू शकतात. गुजराती, मारवाडी समाजाची मते आपसुकच भाजपाकडे वळणार असल्याचा पक्षाचा दावा आहे. तर, मनसेच्या रईस लष्करीया यांच्यामुळे महायुती आणि आघाडी दोघांना समान धोका आहे. लष्करीयांच्या निमित्ताने मराठी आणि मुस्लीम मते विभागली जातील, असा तर्क दिला जात आहे.लोकसभेतील २९ हजार मतांची पिछाडी भरून काढण्याचे मोठे आव्हान अशोक जाधव यांच्यासमोर आहे. तर, जागावाटपाचा तिढा सोडविण्याची कसरत महायुतीला करावी लागणार आहे. प्रबळ इच्छुक उमेदवारांची गर्दी असली तरी त्याचा निवडणुकीत फटका बसणार नाही याची काळजी महायुतीला घ्यावी लागणार आहे.
काँग्रेसला पिछाडी भरण्याचे आव्हान
By admin | Updated: September 8, 2014 02:05 IST