Join us  

वेसावे खाडी होणार ‘गाळमुक्त’, गाळ काढण्यास ४ कोटींच्या निधीस केंद्राची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 5:25 AM

वेसावे खाडीतील गाळ काढण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच ४ कोटी १ लाख रुपये निधी मंजूर केला असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. वेसावे येथील समुद्रातील गाळ गेली १० ते १२ वर्षे काढला जात नव्हता.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : वेसावे खाडीतील गाळ काढण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच ४ कोटी १ लाख रुपये निधी मंजूर केला असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. वेसावे येथील समुद्रातील गाळ गेली १० ते १२ वर्षे काढला जात नव्हता. त्यामुळे केरळनंतर देशात मत्स्यउत्पादनात दुस-या क्रमांकावर असलेल्या वेसावे कोळी वाड्यातील वेसावकरांची कामधेनू असलेल्या वेसावा खाडीची अवस्था बकाल झाली होती, तसेच येथील स्थानिक मच्छीमार बांधवांच्या ३५० बोटी बंदराला लागत नव्हत्या. बोटी त्यांना लांब उभ्या कराव्या लागत होत्या. त्यामुळे कोळी बांधवांची मोठी कसरत होत होती.या प्रकरणी शिवसेनेचे उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी, २०१४ साली येथून खासदार म्हणून निवडून आल्याच्या प्रारंभीच्या काळापासून येथील खाडीतील गाळ काढण्यासाठी आणि मच्छीमार बांधवांचा हा त्रास कमी होण्यासाठी सातत्याने त्यांनी केंद्रीय व राज्य पातळीवर प्रयत्न सुरू केले होते. इंडिया ड्रेझर कंपनी, तसेच महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाकडे त्यांनी सातत्याने पत्रव्यवहार केला. अखेर त्या प्रयत्नाचे फलित म्हणून येथील मच्छीमार बांधवांना दिलासा मिळणार आहे.प्रारंभिक स्वरूपात केंद्र सरकारने ४ करोड १ लाख रुपये आर्थिक निधी मंजूर केला आहे. लवकरच या गाळ उपसणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. या अंतर्गत अंदाजे १ लाख घनमीटरहून अधिक गाळ उचलला जाणार असल्याची माहिती खासदार कीर्तिकर यांनी दिली.या योजनेंतर्गत समुद्रातील पहिल्या टप्प्यातील गाळ उपासण्याच्या कामास प्रारंभ होईल,े तसेच उर्वरित प्रोजेक्टपैकी ३४ करोड रुपये लवकरच मंजूर होतील, अशी माहिती त्यांनी दिली. शिवसेनेची ही वचनपूर्ती असल्याची माहिती माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे व वर्सोवा विधानसभेचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांनी दिली. वेसावे कोळीवाडा परिसरात वचनपूर्तीचे फलक सध्या ठिकठिकाणी झळकले आहेत.निधीअभावी गाळ काढण्याचे काम ठप्पवेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे आणि उपाध्यक्ष पराग भावे यांनी सांगितले की, गेली १० ते १२ वर्षे येथील गाळ काढलेला नव्हता. माजी खासदार गुरुदास कामत यांच्या कारकिर्दीत लोकसभा निवडणुकीपूर्वी येथील गाळ काढण्यास सुरुवात झाली.मात्र, तेव्हा अवघे १० ते १२ दिवसच गाळ काढण्यात आला. पुढे निधीअभावी गाळ काढण्याचे काम ठप्प झाले होते. लवकरच या बहुप्रतीक्षित कामाला सुरुवात होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :मुंबई