Join us  

शताब्दी रूग्णालय :उंदरांच्या चाव्याप्रकरणी यंत्रणांना पालिकेची कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 2:47 AM

कांदिवली पश्चिमेतील शताब्दी रुग्णालय परिसरात उंदरांचा उपद्रव वाढल्याच्या घटना घडल्या आहेत़ काही रुग्णांना उंदीर चावलेदेखील़ याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने उंदीर प्रतिबंधासाठी अतिरिक्त व तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.

मुंबई : कांदिवली पश्चिमेतील शताब्दी रुग्णालय परिसरात उंदरांचा उपद्रव वाढल्याच्या घटना घडल्या आहेत़ काही रुग्णांना उंदीर चावलेदेखील़ याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने उंदीर प्रतिबंधासाठी अतिरिक्त व तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांनी मंगळवारी या रुग्णालयाची पाहणी केली.या रुग्णालयातील पाइपांवर ‘रॅट गार्ड’ बसविणे, जेणेकरून पाइपांच्या आधारे उंदीर रुग्णालयात प्रवेश करू शकणार नाहीत. उंदीर पकडण्यासाठी ग्लु-पॅड, रॅट गार्ड, रॅट ट्रॅप (पिंजरा) यासारख्या विविध साधनांचा वापर अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या अंतर्गत प्रामुख्याने क्लीनअप मार्शलद्वारे रुग्णालयातील स्वच्छताविषयक बाबींवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयाच्या पाहणीत आढळून आलेली उंदरांची बिळे तातडीने शास्त्रीय पद्धतीने बंद करण्याच्या सूचना कीटक नियंत्रण विभागाला देण्यात आल्या आहेत़ छतामध्ये असणारी उंदरांची संभाव्य प्रवेशद्वारे अधिक प्रभावीपणे नियंत्रित करणे. रुग्णालयातील सर्व खिडक्यांना जाळ्या बसविण्याची सूचना देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या साफसफाईसाठी ९ हाउस किपिंग यंत्रणा व ४ बहुउद्देशीय कामगार संस्था यांना अस्वच्छतेच्या संबंधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नियमितपणे पर्यवेक्षण करण्याचेही आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.रुग्णांकडून पैसे मागण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने १ सुरक्षारक्षक व १ कंत्राटी कामगार यांना सेवामुक्त करण्यात आले आहे़ ज्या दोन रुग्णांबाबत उंदीर चाव्याच्या घटना घडल्या, त्यापैकी एका रुग्णाच्या डाव्या डोळ्याजवळ उंदराने चावल्याचे आढळून आले. या रुग्णाची तातडीने नेत्रतज्ज्ञांद्वारे तपासणी करण्यात आली; तसेच ‘व्ही स्कॅन’देखील करण्यात आले. या रुग्णाची प्रकृती आता स्थिर असून त्याच्या डोळ्याला कोणतीही अंतर्गत हानी झालेली नाही. दुसºया रुग्णाच्या उजव्या तळपायाला उंदराने चावल्याचे लक्षात आले. या रुग्णावरदेखील आवश्यक ते औषधोपचार तातडीने करण्यात आले. या रुग्णाची प्रकृतीदेखील स्थिर आहे.

टॅग्स :मुंबई