Join us

भिवंडी आगारात एसटीचा ६६ वा वर्धापन दिन साजरा

By admin | Updated: June 2, 2014 23:05 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ६६ वा वर्धापन दिन रविवारी भिवंडी एसटी आगारात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

भिवंडी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ६६ वा वर्धापन दिन रविवारी भिवंडी एसटी आगारात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रवाशांना सेवा देण्यासाठी व महामंडळास फायदा कसा होईल, आदी विषयांचा ऊहापोह करण्यात आला.भिवंडी आगार कार्यालयाबाहेर हा कार्यक्रम आयोजित केला होता. महिला वाहकांनी रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या प्रसंगी आगार व्यवस्थापक डी.के. भडकमकर यांनी १ जून १९४८ रोजी महामंडळाची पहिली एसटी पुणे ते अहमदनगर धावल्याची माहिती देऊन या प्रवासी सेवेचा आढावा घेतला. भिवंडी आगारातील उत्तम कर्तव्य बजावणार्‍या चालक-वाहकांचे कौतुक करून गेल्या महिन्यात ९३ लाख रुपयांचा तोटा झाल्याचे कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच जास्त उत्पन्न देणार्‍या चालक-वाहकांचा सत्कारही केला. वरिष्ठ लिपीक नूर खान यांनी काही स्वार्थी लोकप्रतिनिधी स्वत:ची खाजगी वाहतूक सुरू करण्याच्या निमित्ताने महामंडळाच्या तोट्यास कारणीभूत असल्याचा आरोप करीत उपस्थित कर्मचार्‍यांना एसटीला फायद्यात आणण्याचे आवाहन केले. वाहतूक नियंत्रक श्याम भोईर यांनी एसटीला अपघात झाल्यास अथवा मारहाण झाल्यास पोलीस स्टेशनमधून पोलिसांची वेळीच मदत न मिळाल्याने वाहक-चालकाबरोबर प्रवाशांचा खोळंबा होतो. तसेच ट्रॅफिक पोलिसांचेदेखील सहकार्य मिळत नाही, असे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले. सहस्थानकप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी एसटी महामंडळ व भिवंडी आगाराची माहिती दिली़ याप्रसंगी स्थानकप्रमुख धर्मा पाटील, सहायक स्थानकप्रमुख व्ही.डी. पाटील, लेखपाल राजेश बुधनेरकर, कार्यशाळाप्रमुख राजा पुण्यार्थी आदी उपस्थित होते. या प्रसंगी एसटीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत प्रवासी प्रतिनिधी म्हणून प्रवाशांची बाजू पत्रकार पंढरीनाथ कुंभार यांनी मांडली व भिवंडी आगाराचा स्वतंत्र वर्धापन दिन साजरा करून आगाराच्या प्रगतीची चर्चा घडवून आणण्याची सूचना आगार व्यवस्थापकांना केली.