Join us

ठाण्यावर सीसीटीव्हीचा वॉच

By admin | Updated: July 17, 2015 23:04 IST

वाहतूक नियम मोडणाऱ्या, अपघात करून पळ काढणाऱ्या अथवा महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी खेचून पोबारा करणाऱ्यांसह वाहनचोरांवर आता सीसीटीव्हींचा वॉच ठेवला जाणार आहे.

- अजित मांडके,  ठाणे

वाहतूक नियम मोडणाऱ्या, अपघात करून पळ काढणाऱ्या अथवा महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी खेचून पोबारा करणाऱ्यांसह वाहनचोरांवर आता सीसीटीव्हींचा वॉच ठेवला जाणार आहे. यासाठी आता ठाणे महापालिकेने पावले उचलली असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात आनंदनगर ते कापूरबावडी आणि दुसऱ्या टप्प्यात कासारवडवलीपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांवर पोलिसांचा कंट्रोल असणार असून एखाद्याने सिग्नल सुटायच्या आत गाडी काढण्याचा प्रयत्न केला तरी तो तत्काळ कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहे. त्यानंतर, दंडाची ई-पावती थेट त्याच्या घरी जाणार आहे. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या आणि महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी खेचणाऱ्यांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण शहरात ५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा पालिकेचा मानस आहे. ५०० सीसीटीव्ही लावणार गेल्या काही वर्षांपासून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा पालिका आणि पोलिसांचा उपक्रम आहे. सुरुवातीला पालिकेने ५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव पुढे आणला होता. यामध्ये हे काम खाजगी संस्थांच्या माध्यमातून केले जाणार होते. त्यानुसार, मोबाइल टॉवर आणि शहरात असलेल्या हायमास्टवर बसविण्यात येणार होते. परंतु, आयुक्तांनी या प्रस्तावाला रेड सिग्नल देऊन नव्याने यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आनंदनगर ते कापूरबावडीपर्यंत हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. परंतु, ते मोबाइल टॉवर अथवा हायमास्टवर लावले जाणार नाहीत. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात कासारवडवलीपर्यंत ते बसविले जाणार आहेत. कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिसांकडे या कॅमेऱ्यांचे संपूर्ण नियंत्रण हे पोलिसांकडे असणार आहे. ते बसविण्यासाठी, नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी आणि इतर कामांसाठी २५-२५ लाखांचा खर्च केला जाणार आहे. मात्र, हा खर्च नंतर पोलिसांकडून वसूल केला जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. या कॅमेऱ्यांमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांसह सोनसाखळी चोर, अपघातास कारणीभूत असलेल्या आणि वाहतूककोंडी सोडविण्यासाठी याचा अधिक उपयोग होणार आहे. एखाद्याने सिग्नल जरी तोडून पळ काढला, तरी त्याच्या गाडीचा क्रमांक हा यात कैद होणार असल्याने त्याला त्याच्या घरी ई-पावती पाठवली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवरही नियंत्रण येणार आहे.