Join us  

ग्राहकांसाठी सीसीपीए मैदानात; प्राधिकरण स्वत: तक्रार दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 2:00 AM

मुख्य आयुक्त निधी खरे यांची माहिती

मुंबई : गेल्या तीन वर्षांत ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या ज्या तक्रारी देशभरातून प्राप्त झाल्या आहेत त्यांचा सविस्तर आढावा घेण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्या क्षेत्रातील तक्रारी जास्त आहेत त्यांच्यावर बारीक नजर असेल. तसेच, तिथे होणारी फसवणूक बंद करण्यासाठी कठोर नियमावली करण्याचे कामही सुरू असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या (सीसीपीए) आयुक्त निधी खरे यांनी दिली.ग्राहक नव्याने स्थापन केलेल्या या ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या अधिकारांबदद्ल ग्राहकांमधे प्रचंड उत्सुकता आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीच्यावतीने एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यात निधी खरे यांनी मार्गदर्शन केले. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांपासून ते पेट्रोल पंपांपर्यंत अनेक ठिकाणी छोटी मोठी फसवणूक होत असते. परंतु, त्यांच्या विरोधातही तक्रार दाखल होत नाही.त्यावरही प्राधिकरण स्वत:हून कारवाईसाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ई काँमर्स कंपन्यांनाही कायद्याच्या कक्षेत आणले असून त्यांनी केलेल्या फसवणूकीच्या विरोधातील कारवाईची मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याशिवाय सिंगल युज्ड प्लँस्टिग, वायू प्रदुषणास कारणीभूत ठरणारी भेसळ अशा विविध आघाड्यांवर ठोस काम येत्या काही दिवसांत होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.कोरोनाचे हास्यास्पद दावे : कोरोनावरील उपचार आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याच्या नावाखाली असंख्य हास्यास्पद दावे केले जात असल्याचे निधी खरे यांनी सांगितले. मात्र, तूर्त त्यांच्या विरोधात थेट कारवाई करता येत नाही. त्यासाठी आरोग्य मंत्रालय आणि फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी आँफ इंडिया (एसएसएसएआय) यांच्या सल्ल्यानुसार पुढील काम करावे लागेल असेही त्यांनी सांगितले.नवे प्राधिकरण शोभेचे बाहुले ठरू नये!नव्या कायद्यामुळे ग्राहकांच्या अधिकारांचे रक्षण होईल अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, या कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी स्थापन झालेल्या प्राधिकरणाला अधिकारही प्राप्त झाले आहेत. आता त्यांना धाडस दाखवत ठोस काम करणे अभिप्रेत आहे. प्राधिकरणाने पारदर्शी पद्धतीने काम केले तर ग्राहकांमधील विश्वास वृध्दिंगत होईल, असा विश्वास मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केला.