Join us  

राजकीय दबावाखाली सीबीआयने गुन्हे नोंदविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 6:34 AM

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी राजकीय दबावाखाली येत सीबीआयने गुन्हे दाखल केले, असा युक्तीवाद ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी गुरुवारी न्यायालयात केला.

मुंबई : सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी राजकीय दबावाखाली येत सीबीआयने गुन्हे दाखल केले, असा युक्तीवाद ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी गुरुवारी न्यायालयात केला. त्यामुळे संतापलेल्या न्यायालयाने या प्रकरणात राजकीय गोष्टी आणण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत जेठमलानी यांना खडसावले. जेठमलानी यांनीदेखील न्यायालयाची माफी मागितली.सीबीआयने राजकीय दबावाखाली येत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांवर सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमकीचा आरोप ठेवला. मात्र, आता त्यांनी व्यवस्थित समतोल साधला आहे, असा बचाव या बनावट चकमक प्रकरणांतून आरोपमुक्तता करण्यात आलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांच्यावतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी गुरुवारी न्यायालयात केला. सोहराबुद्दीन व तुलसीराम प्रजापती कुख्यात गँगस्टर होते. १९९० च्या सुमारे दाऊदने मुंबईत दहशत पसरवण्यास सोहराबुद्दीनला शस्त्रे दिली होती. पोलिसांनी ती जप्त केली. सोहराबुद्दीनवर खंडणी मागितल्यासंबंधीही गुन्हे नोंदविले आहेत. या खटल्यातील साक्षीदारही अट्टल गुन्हेगार आहेत. हे प्रकरण म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असे आहे. या गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना सोहराबुद्दीनचा मृत्यू झाला. गँगस्टरला मारल्याबद्दल कौतुक होण्याऐवजी त्यांच्यावरच बनावट चकमकीचा गुन्हा नोंदवून आरोपी करण्यात आले. हे प्रकरण २००५ मधले आहे. सीबीआयने राजकीय दबावाखाली येत, वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांवर गुन्हा नोंदविला. आता सीबीआयने बराच समतोल साधला आहे, असा युक्तिवाद या प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात आलेले आयपीएस अधिकारी राजकुमार पांडीयन यांच्यावतीने जेठमलानी यांनी न्या. रेवती मोहिते- डेरे यांच्या न्यायासनापुढे केला.