Join us

उमेदवारांची होते दमछाक

By admin | Updated: October 7, 2014 00:32 IST

विक्रमगड विधानसभा निवडणुकीसाठी एकुण १२ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. यामध्ये ९ राजकीय पक्षाचे तर ३ अपक्ष उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत.

जव्हार : विक्रमगड विधानसभा निवडणुकीसाठी एकुण १२ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. यामध्ये ९ राजकीय पक्षाचे तर ३ अपक्ष उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. भाजपाचे उमेदवार विष्णु सावरा यांच्या प्रचार सभेसाठी ना. नितिन गडकरी तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल भुसारा यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जव्हार येथे मोठ्या सभा घेवून वातावरण निर्मिती केली तर शिवसेनेचे उमेदवार प्रकाश निकम यांची प्रचार सभा अद्याप बाकी आहे. आजपर्यंतच्या इतिहासात मतदारसंघात इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात असल्याची ही पहिलीच वेळ आहे. युती, आघाडी तुटणे, मनसे, बविआ, माकपा, बहुजन समाज पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी या पक्षांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत.त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या सभांवर अथवा कार्यकर्त्यांच्या भरवशावर न राहता उमेदवारांचा स्वत: मतदारापर्यंत पोहचण्याकडे कल असल्याने उमेदवाराची मात्र दमछाक होताना दिसत आहे. मतदानाला अवघे ८ दिवस शिल्लक आहेत तर २ दिवस अगोदर प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने बोटावर मोजण्याइतकेच दिवस उमेदवारासाठी प्रचारासाठी शिल्लक आहेत. विक्रमगड मतदारसंघ हा डोंगरदऱ्यात वसलेला विरळ लोकसंख्या असलेला आहे. जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तीन तालुके तर वाडा तालुक्यातील कंचाड, जि. प. गट या मतदारसंघात त्यांचा समावेश आहे. २०० ते ३०० लोकसंख्या असलेले छोटे पाडे दऱ्याखोऱ्यात दुर-दुर अंतरावर आहेत. शिवाय रस्त्यांची दुरावस्था तर काही ठिकाणी रस्तेच नसल्याने उमेदवारांना पायपीट करण्याशिवाय पर्याय नाही.विक्रमगड मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या २,४६, २८८ इतकी असून ३३७ मतदानकेंद्र आहेत. शहरात एवढी मतदारसंख्या एखाद्या कॉलनीची अथवा वस्तीची असल्याने तेथे प्रचार करणे एवढे अवघड नसते. मात्र या मतदारसंघात तीन तालुके व एक जि. प. गटातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे यासाठी उमेदवाराला ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागतो. अशा परिस्थितीत आजपर्यंत १२ पैकी केवळ राष्ट्रवादीचे सुनिल भुसारा, शिवसेनेचे प्रकाश निकम व भाजपाचे उमेदवार विष्णु सावरा या उमेदवारांनीच संंपुर्ण मतदारसंघात प्रचाराच्या दोन फेऱ्या केल्या आहेत. गाड्यांच्या परवानग्या, सभेच्या परवानग्या, कार्यालयाच्या परवानग्या घेणे, मतदारांच्या स्लीप तयार करणे, वचननामे घराघरात पोहचविणे यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी असणे प्रत्येक मतदान केंद्रांवर सुरु आहेत. (वार्ताहर)