Cancel 10 percent of watercolor in Mumbai | 'मुंबईतील दहा टक्के पाणीकपात रद्द करा'
'मुंबईतील दहा टक्के पाणीकपात रद्द करा'

मुंबई : पावसाने चांगला जोर धरल्यामुळे मुंबई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील उपयुक्त साठ्यांमध्ये आतापर्यंत सुमारे ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षी १५ नाव्हेंबरपासून शहर आणि उपनगरांत केलेली १० टक्के पाणीकपात तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतील कपात रद्द करावी, अशी सूचना नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी केली आहे.
गेल्या वर्षी धरण क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणीपुरवठ्यामध्ये १० टक्के कपात केली. तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतही १५ टक्के कपात केली. त्यामुळे उपनगरातील नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. आता तलावांत पुरेसा जलसाठा असल्याने पाणीकपात रद्द करावी, अशी भूमिका योगेश सागर यांनी मांडली.
यंदा जून व जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे तलावातील उपयुक्त जलसाठा साधारणपणे ५० टक्क्यांपर्यंत झाला आहे. शिवाय, सप्टेंबरपर्यंतचे पावसाचे ५७ दिवस आहेत. या काळात समाधानकारक पाऊस पडल्यास पाणीसाठ्यात वाढ होईल. गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे पालिकेने पाणीपुरवठ्यात कपात केली होती. मुंबईतील विशेषत: उपनगरातील नागरिकांना या कपातीचा त्रास होत आहे. यंदाच्या पुरेशा साठ्यामुळे ही कपात तातडीने रद्द करून पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करावा आणि उपनगरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही सागर यांनी केली.


Web Title: Cancel 10 percent of watercolor in Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.