Cafeteria to set up a municipal for tourists near the Penguin orbit | पेंग्विन कक्षाजवळ पर्यटकांसाठी महापालिका उभारणार कॅफेटेरिया
पेंग्विन कक्षाजवळ पर्यटकांसाठी महापालिका उभारणार कॅफेटेरिया

मुंबई : भायखळ्यातील प्रसिद्ध राणीच्या बागेत पेंग्विन पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता पोटपूजाही करता येणार आहे. त्यांच्या जिभेचे चोचले पेंग्विन कक्षामध्येच पुरविले जाणार आहेत. यासाठी या इमारतीमध्येच ५३३ चौरस मीटर जागेत पालिका कॅफेटेरिया सुरू करणार आहे.

भायखळ्याच्या वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ नव्याने एंट्री प्लाझा विकसित करण्यात आला आहे. ज्यामध्ये तिकीटघर, प्याऊ, प्रसाधनगृह, सोव्हेनिअर शॉप, क्लॉक रूम, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. २०१७ मध्ये येथे हेम्बोल्ट जातीचे सात पेंग्विन आणण्यात आले आहेत.
पेंग्विनचे आकर्षण वाढतच असल्याने राणीबागेतील दररोजच्या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. मात्र येथे खाद्यपदार्थांची सुविधा नसल्याने पर्यटकांना उपाशीपोटीच राणीबागेची सफर करावी लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी पेंग्विन कक्षाजवळच उपाहारगृह सुरू करण्यात येणार आहे.

पालिकेला मिळणार महसूल...

या कॅफेटेरियामध्ये वातानुकूलित यंत्रणा, आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व गॅसबँकची सुविधा असणार आहे. हे कॅफेटेरिया पाच वर्षे चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून पालिकेला प्रत्येक महिन्यात पाच लाख ५० हजार २५ रुपये भाडे मिळणार आहे. या भाड्यात दरवर्षी पाच टक्क्यांची वाढ होणार आहे.

कॅफेटेरियाचा पर्यटकांना लाभ
पेंग्विनला पाहण्यासाठी दररोज सुमारे दहा हजार तर सुट्टीच्या दिवशी २० हजार पर्यटक येतात. या पर्यटकांना कॅफेटेरियात चांगल्या चांगल्या पदार्थांचा स्वाद घेता येणार आहे.


Web Title: Cafeteria to set up a municipal for tourists near the Penguin orbit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.