Join us  

भांडुपच्या पोटनिवडणुकीसाठी होणार अटीतटीची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 3:44 AM

काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक ११६ मध्ये बुधवारी पोटनिवडणूक होणार आहे.

मुंबई : काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक ११६ मध्ये बुधवारी पोटनिवडणूक होणार आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता काठावर असल्याने, भाजपाने या प्रभागात मोर्चेबांधणी केली आहे. यासाठी प्रमिला पाटील यांच्या सुनेलाच भाजपाने तिकीट दिले आहे, तर शिवसेनेने स्थानिक आमदारांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. या प्रभागात विजय मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते तिथेच ठाण मांडून असल्याने तणाव वाढला आहे.२०१७ च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रमिला पाटील यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांचा पाचशे मतांच्या फरकाने पराभव केला होता. मात्र , प्रमिला पाटील यांचे काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या प्रभागातील ही रिक्त जागा भरून काढण्यासाठी बुधवारी या प्रभागात पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, पाटील यांचा मुलगा कौशिक यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाने कौशिक यांच्या वहिनी जागृती प्रतीक पाटील यांना उमेदवारी देऊन, शिवसेनेला शह देण्याची तयारी केली आहे.शिवसेनेने आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या प्रभागातून सात जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, जनता सेक्युलर या पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे. मात्र, खरी लढत शिवसेना व भाजपामध्ये असेल. दिना पाटील यांच्या कुटुंबीयांची या प्रभागावर पकड आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता असून, ही मते फिरविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बुधवारी होणाºया मतदान प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :निवडणूकमुंबई