थंडी आहे म्हणून कचरा जाळाल, शेकोटी कराल तर हजार रुपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:56 IST2025-12-09T11:16:23+5:302025-12-09T16:56:24+5:30
घन कचऱ्याचे संकलन, वहन आणि विल्हेवाट, आदी बाबींशी निगडित सुधारित मुंबई महापालिका अधिनियम १८८८ चे कलम ४६२ (ईई) अंतर्गत ‘स्वच्छता आणि आरोग्य याचे उपविधी २००६’ तयार केले आहेत.

थंडी आहे म्हणून कचरा जाळाल, शेकोटी कराल तर हजार रुपये दंड
सीमा महांगडे
मुंबई : वाढत्या प्रदूषणावर महापालिका उपाययोजना करत असताना नागरिकांकडून मात्र त्याला बगल दिली जात आहे. घनकचऱ्याच्या नवीन नियमानुसार उघड्यावर कचरा जाळल्यास एक हजार रुपयांचा दंड आहे. तरी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान ३०५ तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. त्यानुसार पालिकेने एक लाख ८७ हजारांचा दंडही वसूल केला असून, यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे.
घन कचऱ्याचे संकलन, वहन आणि विल्हेवाट, आदी बाबींशी निगडित सुधारित मुंबई महापालिका अधिनियम १८८८ चे कलम ४६२ (ईई) अंतर्गत ‘स्वच्छता आणि आरोग्य याचे उपविधी २००६’ तयार केले आहेत. त्यानुसार पालिकेकडून स्वच्छतेसाठी वेळोवेळी कारवाई होते. या दरम्यान उघड्यावर कचरा जाळल्याने त्यातून विषारी वायू, कणयुक्त पदार्थ, आदी घटक बाहेर पडतात. ज्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होते आणि श्वसनाचे आजार बळावत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत उघड्यावर कचरा जाळताना कोणी आढळल्यास स्वच्छता उपविधी तरतुदीनुसार शंभर रुपये इतकाच दंड आकारला जात होता. एप्रिलपासून २०२५ पासून जर कोणी उघड्यावर कचरा जाळताना आढळल्यास त्याला जागेवरच एक हजार रुपये इतका दंड आकारण्यात येत आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांसोबत उघड्यावर कचरा जाळणे, शेकोट्यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. विशेषतः पोर्ट ट्रस्टसारख्या परिसरात याचे प्रमाण अधिक असल्याने नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे.
भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महापालिका
परिसर प्रकरणे दंड (रु.)
कफ परेड, कुलाबा ३ २,५००
भेंडी बाजार, मस्जिद बंदर ० ०
काळबादेवी, चिरा बाजार ५ २५,०००
मलबार हिल, गिरगाव, ग्रँट रोड ० ०
भायखळा, माझगाव, चिंचपोकळी ० ०
सायन कोळीवाडा, अँटॉप हिल १ १,०००
नायगाव, परळ ० ०
माटुंगा पश्चिम, दादर प. ० ०
वरळी बिडीडी ० ०
वांद्रे पू., टीचर्स कॉलनी ६१ ३१,८००
सांताक्रूझ प., खार १ १००
विले पार्ले पू., जेबी नगर ३ १,२००
परिसर प्रकरणे दंड (रु.)
चार बंगलो, वर्सोवा ० ०
चुनाभट्टी सायन, कुर्ला २४ ३७,५००
मानखुर्द, गोवंडी ० ०
चेंबूर, टिळक नगर १६ १८,०००
विद्याविहार, घाटकोपर ६ ७,०००
मालवणी, मढ, मार्वे रोड २८ १०,९००
गोरेगाव, राम मंदिर २१ ७,५००
बोरिवली, वजिरा नका १८ ९,९००
अशोक वन दहिसर, एक्सर रोड ५३ १९,९००
कांदिवली, पोयसर, चारकोप २१ ७,५००
भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग २ २००
मुलुंड, नाहूर ९ २,६००