Join us

बांधकाम परवानगी आॅनलाइन

By admin | Updated: June 29, 2015 05:17 IST

बांधकामविषयक परवानग्या देण्याच्या कामात सुसूत्रता आणि गतिमानता आणण्याच्या दृष्टीने सिडकोने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

नवी मुंबई : बांधकामविषयक परवानग्या देण्याच्या कामात सुसूत्रता आणि गतिमानता आणण्याच्या दृष्टीने सिडकोने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार यापुढे बांधकामविषयक कोणतीही परवानगी हवी असल्यास विकासकांना आॅनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी आॅटो-डीसीआर हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. सध्या या सॉफ्टवेअरची चाचपणी सुरू असून, लवकरच ते प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याचा सिडकोचा मानस आहे.सिडकोच्या नयना क्षेत्रात भविष्यात अनेक प्रकल्प येऊ घातले आहे. खासगी विकासकांनी या परिसरात मोठमोठे गृहप्रकल्प प्रस्तावित केले आहेत. मात्र सिडकोकडून बांधकामविषयक परवानग्या मिळण्यास विलंब होत असल्याने या परिसरातील शेकडो प्रकल्प रखडले आहेत. सिडकोच्या या वेळकाढू धोरणाचा सर्वाधिक फटका विकासकांना बसला आहे. बांधकाम परवानगी मिळण्यास उशीर होत असल्याने गुंतवणूकदारही धास्तावले आहेत. यासंदर्भात बिल्डर्स संघटनांच्या प्रतिनिधींनी वारंवार केलेल्या तक्रारींची दखल घेत सिडकोने बांधकामविषयक परवानग्या देण्याची प्रक्रिया पारदर्शक व गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आॅटो-डीसीआर हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. या नवीन कार्यप्रणालीनुसार यापुढे विकासकांना बांधकामविषयक कोणतीही परवानगी घेण्यासाठी सिडको कार्यालयाच्या खेटा माराव्या लागणार नाहीत. संबंधितांनी आपले आर्किटेक्चरल प्लानच्या नकाशासह इतर आवश्यक कागदपत्रे जोडून या सॉफ्टवेअरवर आॅनलाइन अर्ज करायचा आहे. सादर केलेल्या या कागदपत्रांची आॅनलाइन तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार पात्र अर्जदारांना या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आॅनलाइनच आवश्यक परवानग्या दिल्या जाणार आहेत. त्यामुळे विविध परवानग्यांअभावी रखडलेल्या बांधकाम प्रकल्पांना गती मिळणार आहे. आॅटो-डीसीआर या सॉफ्टवेअर प्रणालीची माहिती देण्यासाठी गेल्या आठवड्यात सिडको कार्यालयात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला शहरातील वास्तुविशारद, बिल्डर्स संघटनांचे प्रतिनिधी व खासगी गुंतवणूकदार उपस्थित होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी उपस्थितांना हे सॉफ्टवेअर विकसित करण्यामागचा सिडकोचा हेतू विशद केला. तसेच या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे बांधकामविषयक परवानग्या देण्याच्या कामात पारदर्शकता व गतिमानता येईल, असा विश्वासही व्यक्त केला. तर सिडकोचे मुख्य नियोजनकार एम.डी. लेले यांनी या सॉफ्टवेअरच्या कार्यप्रणालीची माहिती दिली. दरम्यान, या सॉफ्टवेअरविषयी विकासक व वास्तुविशारदकांनी काही सूचना व बदल सुचविले आहेत. त्यानुसार काही सुधारणा करून लवकरच ही आॅनलाइन कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली. रखडपट्टी टळणारच्परिपूर्ण कागदपत्रांसह बांधकाम परवानगीसाठी एकदा आॅनलाइन अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रत्येक स्तरावर आपोआप पडताळणी होणार आहे. सदर अर्जाची फाइल कुठे व कोणत्या कारणासाठी रेंगाळली आहे, याची माहिती सुद्धा संबंधित अर्जदाराला घेणे शक्य होणार आहे. च्कोणत्याही कारणामुळे फाइलवर निर्णय होण्यास निर्धारित काळापेक्षा अधिक वेळ लागत असल्यास फाइल आपोआप वरिष्ठांकडे जाईल, अशी तरतूद आॅटो-डीसीआर या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही स्तरावर कोणत्याही कारणांमुळे फाइल रखडल्यास संबंधित अर्जधारकाला त्याची आॅनलाइन माहिती घेता येणार आहे. च्एखाद्या बांधकाम प्रकल्पाची वैधता तपासण्यासाठी नागरिकांच्या दृष्टीने सुद्धा हे सॉफ्टवेअर उपयुक्त ठरणार आहे. बांधकामाला ओसी आहे की नाही, भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे का, बांधकामाची सद्य:स्थिती आदींची माहिती सिडकोच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणाऱ्या आॅटो-डीसीआर या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नागरिकांना घेता येणार आहे.