Join us  

मालाड एसआरए प्रकल्पातील इमारत झाली धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 1:08 AM

निकृष्ट बांधकाम : एसआरएच्या अधिकाऱ्यांची डोळेझाक

मुंबई : मालाड (पूर्व) नवजाला पाडा येथे एसआरए योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने इमारतीला धोका पोहोचून जीवितहानी होण्याची भीती रहिवाशांना वाटत असली तरी एसआरए प्राधिकरणाचे अधिकारी केवळ येथे पाहणी करण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई करीत नसल्याबद्दल रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हाजी बापू रोडवर नगर भूमापन क्र. २३, २३/१ ते २४५ वर रश्मी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स या विकासकाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत इमारती बांधल्या आहेत. या इमारतींच्या उभारणीसाठी विकासकाने वापरलेले साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे इमारतीस धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याबाबत सभासदांनी संबंधित विभागांकडे तक्रारी केल्या आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने या तक्रारींची दखल घेत ९ आॅगस्ट २0१८ रोजी विकासकाला पत्र पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले होते.

रहिवाशांनी सातत्याने तक्रारी केल्यानंतर प्राधिकरणाने ३0 जानेवारी २0१९ रोजी याबाबत बैठकीचे आयोजन केले. त्या बैठकीला विकासक उपस्थितही राहिला नाही. त्यामुळे १0 जुलै २0१९ रोजी पुन्हा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीनंतर प्राधिकरणाच्या दोघा अधिकाऱ्यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, असे सभासद विद्याधर तोंडे यांनी सांगितले.याचबरोबर इमारतीच्या काही भागाला ताबा प्रमाणपत्र मिळालेले नसतानाही सदनिकांचा ताबा देण्यात आल्याची तक्रारही सभासदांनी केली आहे. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनीही मुख्यमंत्री तसेच एसआरए प्राधिकरणाला निवेदन सादर करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत विकासक हेमंत परसराम पुरीया यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.