Join us

पाणीटंचाईने कोलमडले उरणवासीयांचे बजेट

By admin | Updated: May 8, 2015 00:34 IST

उरण तालुक्यातील सव्वा लाख लोकसंख्येच्या २६ ग्रामपंचायतींना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या रानसई धरणाची पाणीपातळी प्रचंड खालावली आहे.

उरण : उरण तालुक्यातील सव्वा लाख लोकसंख्येच्या २६ ग्रामपंचायतींना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या रानसई धरणाची पाणीपातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे काही दिवसांचाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने उरण तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लग्नसराईलाही याची झळ बसली आहे. सोहळ्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटरच्या महागड्या बाटल्या विकत घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे सोहळ्यांबरोबरच नागरिकांचेही आर्थिक बजेट कोलमडले आहे.उरण तालुक्यातील अनेक गावांना फेब्रुवारी-मार्चपासूनच भीषण पाणीटंचाईने ग्रासले आहे. करंजा गावातील नागरिकांना पाण्यासाठी १२-१५ दिवस प्रतीक्षा करावी लागते. सुमारे १२ हजार लोकसंख्या असलेल्या केगावमधील रहिवाशांनाही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. विहिरी, तलाव व बोअरवेल यांनी तळ गाठला आहे. याआधी दोन दिवसांआड मिळणारे पाणी आता ८-१० दिवसांनंतर तरी मिळेल की नाही, याची शाश्वती राहिली नसल्याने पाण्यासाठी लग्नसमारंभाबरोबरच आणि इतर कार्यक्रमांनाही फाटा देण्याची पाळी आली आहे. अनेक बोअरवेलचे पाणी पिण्यालायक नसल्याने तहान भागविण्यासाठी मिनरल वॉटरचा वापर करू लागले आहेत. एक लीटरच्या बॉटलसाठी १५ ते २० तर २० लिटर्स प्लास्टिक बॉटलसाठी ५५ ते ६० रुपये खर्च करण्याची वेळ टंचाईग्रस्त गावांवर आली आहे. मिनरल वॉटर आणि इतर पर्यायांवर रोज सुमारे १००-२५० रुपये खर्च करण्याची पाळी आली आहे. ग्रामपंचायत आणि एमआयडीसी परस्परांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत आहेत. कहर म्हणजे पाणीटंचाई कुठेही नसल्याचा दावा उरण पंचायत समितीकडून केला जात आहे. (वार्ताहर)