Brother took the initiative to campaign for sister | बहिणीच्या प्रचारासाठी भावाने घेतला पुढाकार
बहिणीच्या प्रचारासाठी भावाने घेतला पुढाकार

खलील गिरकर 

मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या कॉंग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांच्या प्रचारामध्ये त्यांचे बंधू अभिनेते संजय दत्त यांचा मोठा सहभाग आहे. प्रिया दत्त यांच्या प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात संजय दत्त यांचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. दत्त यांचे पिता दिवंगत सुनील दत्त यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून दत्त यांच्या पुण्याईचा लाभ प्रिया यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संजय दत्तला प्रचारात सक्रिय करण्यात आले आहे.

संजय यांनी भाषणबाजी करण्याऐवजी केवळ प्रचारफेरीमध्ये सहभागी होण्याला प्राधान्य दिले आहे. बहिणीच्या प्रचारासाठी त्यांनी आपल्या शुटिंगच्या व्यस्त वेळापत्रकाला काही दिवस दूर ठेवले आहे. प्रिया दत्त यांना विजयी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यावर दत्त यांनी भर दिला आहे.

भाऊ संजय यांच्याशिवाय प्रिया यांच्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याने थेट प्रचारामध्ये भाग घेतलेला नाही.
संजयच्या प्रचार फेऱ्यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या प्रचारफेऱ्यांना होणाºया गर्दीचे मतांमध्ये रुपांतर करण्याचे आव्हान आता प्रिया दत्त यांच्यासमोर आहे.

बंधू । संजय दत्त
बॉलीवूड अभिनेता म्हणून प्रसिध्द असलेल्या संजय दत्त यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. संजय दत्त यांच्या माध्यमातून प्रिया दत्त यांचा प्रचार करुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न दत्त कुटुंबियांकडून करण्यात आला असून त्याला चांगला प्र्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

प्रिया दत्त । कॉंग्रेस
प्रिया दत्त यांचे पिता तत्कालिन खासदार सुनील दत्त यांचे निधन झाल्यावर प्रिया दत्त यांनी २००५ मध्ये झालेली पोटनिवडणुक लढवली व त्यामध्ये विजय मिळवला. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी त्यांचा दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला होता. नर्गिस दत्त फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रिया दत्त यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे.


Web Title: Brother took the initiative to campaign for sister
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.