Join us

विचारांचा पूल भिडणार ओंकारेश्वर पुलाला!

By admin | Updated: August 8, 2014 00:40 IST

‘रिंगणनाट्य’ सज्ज : दाभोलकर हत्येच्या वर्षपूर्तीनिमित्त कृतिशील निषेधाचा कलात्मक मार्ग

राजीव मुळ्ये - सातारा -- कलावंतामधला ‘कार्यकर्ता’ जागा झाला. कार्यकर्त्यामधला ‘कलावंत’ जागा झाला. या दोघांमधला पूल बांधला गेला ठाम भूमिकेच्या भक्कम काँक्रिटने... पुलावरून चालू लागलेत नवविचाराच्या पालखीचे शेकडो भोई... उभा महाराष्ट्र दहा दिवसांत पिंजून काढून ते पोहोचतील ओंकारेश्वर पुलावर... वीस आॅगस्टला!महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या होऊन वर्ष उलटलं. विचारांना गोळी घालण्याचा निरर्थक प्रयत्न करणाऱ्यांना वाटलं, वर्षभरात सारं शांत झालं असेल. पण ठिणगीचा वणवा झाला. कानाकोपऱ्यातून माणसं एकवटली आणि विचार-स्वातंत्र्याभोवती रचलं अभेद्य ‘रिंगण’. हे रिंगण गुंफलंय विचारांच्या धाग्यात. ‘रिंगणनाट्य’ नावाचा हा झंझावात डॉक्टरांच्या कर्मभूमीत, साताऱ्यात येत्या रविवारी (दि. १०) घोंगावू लागेल आणि त्याचा उत्कर्षबिंदू असेल पुण्यातला शंभरावा प्रयोग. होय, दहा दिवसांत शंभर प्रयोग!रिंगणनाट्य ही संकल्पना समर्पित दिग्दर्शक अतुल पेठे यांची. खरा कलावंत संवेदनशील आणि भोवतालाविषयी जागरूक असतो, हे दाखवून देत पेठे यांनी स्वयंप्रेरणेनं एक वर्ष ‘अंनिस’ला देऊ केलं. चळवळीचा सांस्कृतिक विभाग सक्षम असेल, तर चळवळ वेगानं पुढे जाते, हे ओळखून! पथनाट्य आणि पारंपरिक नाट्य (प्रोसीनियम) यांच्यात सुवर्णमध्य साधणारा ‘रिंगणनाट्य’ हा आविष्कार त्यांनी विचारपूर्वक विकसित केला. कलावंतामध्ये एक कार्यकर्ता असतो आणि कार्यकर्त्यात एक कलावंत असतो, हे ओळखून त्यांनी दोहोंमधला विचार जागा केला. ‘विषय मनापासून पटला नसेल तर मांडणी व्यवस्थित होत नाही,’ असं त्यांचं म्हणणं. त्यामुळं कलावंताला विचार पटवून सांगणं आणि कार्यकर्त्याला रंगमंच समजून सांगणं अशी दुहेरी भूमिका पेठे यांनी पार पाडली.लोकपरंपरा, एकनाथी भारूड, कीर्तन ही रिंगणनाट्याची प्रेरणास्थाने आहेत. बादल सरकार यांनी बंगालमध्ये निर्माण केलेली ‘आँगननाट्य’ चळवळही प्रेरणास्थानी आहे. डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध तातडीने घेतला जावा, या मागणीसाठी कृतिशील निषेधाचा मार्ग म्हणून रिंगणनाट्याचा प्रारंभ होत आहे. १असा झाला रिंगणनाट्याचा प्रवासचार महिन्यांत अतुल पेठे यांनी चार कार्यशाळा घेतल्या. त्यातून १५० कार्यकर्ते तयार केले. अंधश्रद्धेशी संबंधित अनेक विषय निवडले आणि कार्यकर्त्यांकडूनच नाटकाच्या संहिता लिहवून घेतल्या. २ कार्यकर्त्यांचे १८ गट तीन महिन्यांत बांधण्यात आले. प्रत्येक गटात १२ ते १५ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ३ जादूटोणाविरोधी कायदा, अघोरी उपचारपद्धती, शहरी अंधश्रद्धा, मानसमित्र प्रकल्प, जातपंचायत अशा विविध विषयांवर १५ ते २० मिनिटांची १८ नाटके तयार झाली.४ चळवळीची तीच ती जुनी गाणी अजून गायिली जातात. ती वगळून कार्यकर्त्यांकडूनच नवी गाणी लिहवून घेतली. त्यातील ६ निवडली आणि चालीही कार्यकर्त्यांनीच बांधल्या.५ सर्व नाटके वेगवेगळ्या विषयांवरील असली, तरी त्यात एक समान धागा आहे. वेगवेगळी नाटके वेगवेगळ्या ठिकाणी करणे, तसेच सर्व नाटके एकापाठोपाठ एक सादर करणेही शक्य आहे.६ वर्षभरात राज्यात कलावंतांचे आणखी ३० गट बांधले जातील. गटांची एकूण संख्या ५० होईल आणि ‘रिंगणनाट्य’ हे विचारांच्या प्रसाराचे नवे माध्यम म्हणून आकार घेईल.असे होणार सादरीकरणरिंगणनाट्य हा पथनाट्याचा सुधारित आविष्कार असून, पारंपरिक नाटकासारखा खर्चिकही नाही. रिंगणनाट्य रस्त्यावर सादर न होता मैदानात सादर होणारा लवचिक नाट्यप्रकार आहे. चारही बाजूंनी प्रेक्षक असतील तर माणसांचे रिंगण वर्तुळाकृती असेल. जर एकाच बाजूला प्रेक्षक असतील तर रिंगण अर्धवर्तुळाकृती असेल आणि नाट्यप्रवेशांना मानवी भिंतीची पार्श्वभूमी मिळेल. जुजबी वस्तू (प्रॉपर्टी), थोडीफार वेशभूषा आणि पारंपरिक वाद्यांसह ध्वनिवर्धक यंत्रणेचाही वापर केला जाईल, जेणेकरून गर्दी-गोंगाटात फार मोठ्या आवाजात संवाद म्हणावे लागू नयेत. नाटक सादर झाल्यावर गर्दीतून झोळी फिरवून पैसे जमविले जातील आणि पुढील प्रयोगांचा खर्च त्यातूनच केला जाईल. नसीरुद्दीन शाह उपस्थित राहणारदहा तारखेला सकाळी आठ वाजता सातारच्या कर्मवीर पुतळा परिसरात चळवळींच्या गाण्यांचे सादरीकरण होऊन तिथून राधिका संकुलापर्यंत मोर्चा काढला जाईल. तिथे सर्वच्या सर्व १८ नाटके ओळीने सादर होतील. यासाठी सुमारे पाच तासांचा वेळ लागणे अपेक्षित आहे. त्यानंतर हे सर्व गट आपापल्या भागात आपापल्या नाटकाचे प्रयोग दहा दिवस करीत राहतील. पुण्यात येत्या वीस तारखेला डॉ. दाभोलकर यांची हत्या जेथे झाली, त्या ओंकारेश्वर पुलावर चळवळीची गाणी सादर होतील. नंतर मनोहर मंगल कार्यालयात रिंगणनाट्याचा शंभरावा प्रयोग होईल. यावेळी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, डॉ. श्रीराम लागू, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शिका सुमित्रा भावे आदी उपस्थित राहणार आहेत.