Join us  

प्रदूषण, बदलत्या जीवनशैलीमुळे स्तनाचा कर्करोग वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिलांमध्ये सर्वाधिक आढळून येणाऱ्या स्तनांच्या कर्करोगात गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महिलांमध्ये सर्वाधिक आढळून येणाऱ्या स्तनांच्या कर्करोगात गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलच्या आकडेवारीनुसार, २०१६ ते २०२१ या पाच वर्षात मुंबईत ४६५ महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले आहे. यात चाळिशीपार केलेल्या महिलांची संख्या सर्वांधिक आहे. स्तनाच्या कर्करोगाने पीडित असणाऱ्या ५० वयापेक्षा जास्त महिलांची संख्या २९५ इतकी असून, प्रदूषण, बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि आरोग्याकडे दुर्लक्ष ही यामागील मुख्य कारणे आहे. या आजारावर त्वरित उपचार होत नसल्याने स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे.

भारतात महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतातील एकूण कर्करोगबाधित महिलांच्या संख्येत स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण २५ ते ३० टक्के आहे. नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, स्तनाचा कर्करोग भारतीय शहरांमध्ये विशेषत: दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये आरोग्याची चिंता बनली आहे. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अमेरिकेत आठपैकी एक आहे, तर भारतात शहरी भागात ३० पैकी एक आणि ग्रामीण भागात ६० पैकी एक आहे. भारतातील तरुण स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग प्रत्यक्षात पाश्चिमात्य देशांपेक्षा चार पट अधिक आहे.

--

कोट

स्तनाची गाठ आढळून आली तरी बऱ्याचदा लाज वाटत असल्याने अनेक तरुण महिला डॉक्टरांकडे उपचारासाठी वेळेवर येत नाहीत. याच कारणांमुळे कर्करोगाचे निदान तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात होते. भारतात स्तनाच्या कर्करोगाचे उशिरा होण्याचे प्रमाण ५० टक्के इतके आहे. स्तनाच्या कर्करोगावर उपचारासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन आणि हार्मोनल थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. परंतु, कर्करोगावरील खर्च सर्वसामान्यांना परवडण्याजोगा नसल्याने अनेक महिला उपचार घेणे टाळतात.

- डॉ. संदीप बिपटे, ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जन

--

एप्रिल २०२० ते जुलै २०२१ या वर्षात स्तनांच्या कर्करोगाची ८० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यातील नऊ रुग्ण ४० वयापेक्षा जास्त असून २३ रुग्ण ४१ ते ४९ वयोगटातील आहेत. तर उर्वरित ४८ रुग्ण पन्नाशीच्या पुढील आहेत. २०१३ पासून आतापर्यंत स्तनाच्या कर्करोगाच्या ९०० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले आहेत. बदललेली जीवनशैली, प्रदूषण, चुकीचा आहार आणि आरोग्याकडे दुर्लक्ष ही यामागील मुख्य कारणे आहे. या आजारावर त्वरित उपचार होत नसल्याने स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढत आहे.

- डॉ. धैर्यशील सावंत, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन

--

दृष्टिक्षेप

पाच वर्षांची स्तनाच्या कर्करोगाची आकडेवारी

- ऑगस्ट २०१६ ते जुलै २०२१ या कालावधीत एकूण ४६५ स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळले आहेत.

- ४० वयापेक्षा जास्त ६० रुग्णांची नोंद

- ४१ आणि ४९ वयोगटातील ११० रुग्णांची नोंद

- ५० पेक्षा जास्त वयोगटातील २९५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे.

--