Join us  

परळच्या ‘त्या’ खासगी रुग्णालयाकडून नियमभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:51 AM

मुंबई : महापालिकेकडून जागा अथवा सुविधा घेऊन रुग्णालय बांधल्यानंतर पालिकेच्या अटी व शर्ती रुग्णालय प्रशासन सर्रास मोडीत आहे. परळ ...

मुंबई : महापालिकेकडून जागा अथवा सुविधा घेऊन रुग्णालय बांधल्यानंतर पालिकेच्या अटी व शर्ती रुग्णालय प्रशासन सर्रास मोडीत आहे. परळ येथील ग्लोबल हे खाजगी रुग्णालय सामान्य व गरजू रुग्णांसाठी १५ टक्के खाटा राखून ठेवणे, तसेच मैदान बांधून देणार होते. मात्र या नियमांचा संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाकडून भंग होत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने बोलावलेल्या बैठकीत नियम मोडल्यास संबंधित रुग्णालयाचे ताबा प्रमाणपत्र रोखण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालय, ब्रह्माकुमारी रुग्णालय अशा काही रुग्णालयांच्या तक्रारी यापूर्वी आल्या होत्या. त्यानंतर आता परळ येथील या खाजगी रुग्णालयाबाबतही तक्रार पुढे आली होती. याबाबत विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आपल्या दालनात पालिका व ग्लोबल रुग्णालयातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सामान्य व गरजू रुग्णांसाठी तातडीने १५ टक्के खाटा उपलब्ध करून न दिल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्यात यावी, अशी सूचना रवी राजा यांनी केली.

या बैठकीत उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) सुनील धामणे यांनी कार्यकारी आरोग्य अधिकाºयांना संबंधित रुग्णालय प्रशासनाला नोटीस देण्याचे आदेश दिले. मात्र, या रुग्णालयात गरिबांसाठीच्या १५ टक्के खाटा वर्मा ट्रस्टला देण्यात येतात, असा दावा या रुग्णालयाचे साहाय्यक व्यवस्थापक प्रसाद सुर्वे यांनी केला. त्यावर पालिकेच्या साहाय्यक आरोग्य अधिकाºयांनी आक्षेप घेत नियमानुसार १५ टक्के रुग्णांसाठी असलेल्या खाटा पालिका आरोग्य खात्याच्या नियंत्रणात राहतील असे स्पष्ट केले.

टॅग्स :हॉस्पिटल