महापालिकेला पोलिसांवर भरवसा नाय का?; पहिल्यांदाच बीएमसीच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 03:50 PM2020-08-12T15:50:33+5:302020-08-12T15:53:22+5:30

मात्र आता पहिल्यांदाच पालिकेत आयुक्तांच्या सुरक्षेसाठी खासगी बाऊन्सर्स तैनात करण्यात आल्याने विरोधकांनी यावर आक्षेप घेतला आहे.

Bouncers deployed for BMC security for the first time in History, Corporator upset | महापालिकेला पोलिसांवर भरवसा नाय का?; पहिल्यांदाच बीएमसीच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स तैनात

महापालिकेला पोलिसांवर भरवसा नाय का?; पहिल्यांदाच बीएमसीच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स तैनात

Next
ठळक मुद्देपालिका आयुक्तांना भेटण्यासाठी नगरसेवक आणि लोक येत असतातगेल्या १० दिवसांपासून महापालिकेत बाऊन्सर्स तैनात आहेतविरोधी पक्ष भाजपा आणि काँग्रेसने आयुक्तांच्या निर्णयावर आक्षेप घेतला

मुंबई – अनेकदा आपण सेलेब्रिटींच्या भोवती खासगी बाऊन्सर्सला सुरक्षा कडं पाहतो, सेलेब्रिटी कोणत्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांच्याभोवती चाहते गोळा होतात. या गर्दीतून त्यांना वाचवण्यासाठी बाऊन्सर्स ठेवले जातात. मात्र आता हे बाऊन्सर्स चक्क मुंबई महापालिकेत तुम्हाला दिसणार आहेत. काळ्या ड्रेसमधील बॉडीबिल्डर बाऊन्सर्स महापालिका आयुक्तांना सुरक्षा देणार आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील महापालिक सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. याठिकाणी सुरक्षेसाठी पालिकेचे स्वत:चे सुरक्षा रक्षक आणि पोलीस असतात. मात्र आता पहिल्यांदाच पालिकेत आयुक्तांच्या सुरक्षेसाठी खासगी बाऊन्सर्स तैनात करण्यात आल्याने विरोधकांनी यावर आक्षेप घेतला आहे.

मुंबई महापालिका  आयुक्तांना कोणाची भीती आहे? पालिका आयुक्तांना भेटण्यासाठी नगरसेवक आणि लोक येत असतात. मग असं असताना खासगी बाऊन्सर्स बोलावण्याची वेळ का आली आहे असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबई महापालिकेकडे स्वत:चे साडेतीन हजार सुरक्षा रक्षक असताना खासगी बाऊन्सर्सवर लाखो रुपयांची उधळपट्टी का केली जातेय? असा सवाल विरोधकांनी केला आहे.

 मुंबई महापालिकेत एन्ट्री घेण्यापासून आयुक्तापर्यंत एरव्ही पालिकेचे सुरक्षा रक्षक पाहायला मिळतात. मात्र आता पालिकेच्या सुरक्षा रक्षकांवर आयुक्तांचा भरवसा राहिला नाही असं दिसून येते. गेल्या आठवड्यात भाजपाच्या नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते तर बेस्ट व्यवस्थापकांनाही घेराव घालून त्यांना कोंडून ठेवले होते. या आंदोलनाचा बहुदा पालिका आयुक्तांनी धसका घेतलाय का? की नगरसेवक गुंड आहेत म्हणून बाऊन्सर्स बोलावले असं भाजपानं प्रश्न उपस्थित केलाय.

या प्रकारावरुन महापालिकेतील विरोधी पक्ष भाजपा आणि काँग्रेसने आयुक्तांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. भाजपा नेते प्रभाकर शिंदे म्हणाले की, महापालिका आयुक्तांना कशाची भीती वाटतेय? म्हणून त्यांना बाऊन्सर्स बोलवावे लागले. महापालिका आयुक्तांना पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि मुंबई पोलिसांवर भरवसा नाही असं ते म्हणाले.

तर मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा असा प्रकार घडत आहे. जेव्हा आयुक्तांना स्वत:च्या सुरक्षेसाठी कार्यालयाच्या बाहेर बाऊन्सर्स उभे करावे लागत आहेत. आयुक्तांना नगरसेवक आणि सामान्य जनतेपासून सुरक्षित वाटत नसेल तर त्यांनी मंत्रालयात बदली करुन घ्यावी असं विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटलं आहे.

महापालिकेच्या सूत्रांनुसार गेल्या १० दिवसांपासून महापालिकेत बाऊन्सर्स तैनात आहेत. मुख्यालयाच्या गेट नंबर १ आणि ६ वर सुरक्षा रक्षकांसोबत बाऊन्सर्स तैनात असतात. बीएमसीत होणाऱ्या आंदोलनामुळे आयुक्तांनी खासगी बाऊन्सर्स ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ३० बाऊन्सर्स सध्या पालिकेत तैनात करण्यात आले आहेत. विविध अधिकारी आणि आयुक्तांच्या दालनाबाहेर हे बाऊन्सर्स तैनात असतात.

Web Title: Bouncers deployed for BMC security for the first time in History, Corporator upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.