मुंबई : बोरिवली पूर्वेकडील राजेंद्र नगर परिसरात काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाला. यात संतोष परब उर्फ बाबू (३८) याची मारेकर्यांनी क्रूर हत्या केली. तर त्याचा साथीदार शिवकुमार सिंग हा जखमी असून त्याच्यावर शताब्दी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी होता.कस्तुरबा मार्ग पोलिसांनी या प्रकरणी हत्या व हत्येचा प्रयत्न असा गुन्हा नोंदवून मारेकर्यांचा शोध सुरू केला आहे. जखमी शिवकुमार याच्या जबाबातून मारेकर्यांची नावे पोलिसांना समजली आहेत. तसेच हा हल्ला पूर्ववैमनस्यातून घडल्याचेही स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांमध्ये अशोक कोळी, लालबाबू बसारे, घनश्याम बसारे आणि साथीदारांचा सहभाग होता. त्यांचा शोध सुरू आहे. याबाबत वरिष्ठ निरिक्षक भारत वरळीकर यांनी सांगितले, या दोन्ही गटांमध्ये परिसरातील वर्चस्वावरून वैमनस्य होते. गेल्या दोनेक वर्षांमध्ये आपापसातील वादाची कोणतीही तक्रार नव्हती. मात्र काल संध्याकाळी किरकोळ कारणावरून दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली आणि मध्यरात्री हा प्र्रकार घडला.मृत संतोष परब हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पातळीवरील पदाधिकारी होता. तसेच त्याच्याविरोधात सहा गुन्हे दाखल होते, असे वरळीकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)