Join us

पालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:08 IST

८९ लाख रुपयांची पुस्तकं खरेदी करण्याचा प्रस्तावलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोन वर्षांपूर्वी महापालिकेने सुरू केलेल्या सीबीएसई आणि ...

८९ लाख रुपयांची पुस्तकं खरेदी करण्याचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दोन वर्षांपूर्वी महापालिकेने सुरू केलेल्या सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांसाठी मुंबई महापालिका ८९ लाख रुपयांची पुस्तके घेणार आहे. या १२ शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात चार हजार २७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालिकेने दोन वर्षांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू केली होती. या शाळांना मिळणारा प्रतिसाद पाहिल्यानंतर सीबीएसई बोर्डाच्या ११ नवीन शाळा विद्यमान वर्षापासून सुरू करण्यात आल्या. एप्रिल महिन्यात लॉटरी पद्धतीने या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला; मात्र पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी येणारे बहुतांशी विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने त्यांच्यासाठी पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत.

पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी २७ शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात येतात. त्याचप्रमाणे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही मोफत शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे. या शाळांसाठी पुस्तकांची निवड करण्यासाठी पालिकेने उपशिक्षणाधिकारी यांची समिती नियुक्त केली. या समितीने काही ठरवलेली पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही खासगी प्रकाशकांच्या पुस्तकांचाही समावेश करण्यात आला आहे.