Join us  

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात निलंबित पोलिसासह बुकीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:05 AM

सचिन वाझेला पुरविले बेनामी सीमकार्डलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझेचाच हात असल्याचा दावा ...

सचिन वाझेला पुरविले बेनामी सीमकार्ड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझेचाच हात असल्याचा दावा राज्य दहशतवादविरोधी पथकाने केला आहे. अशात, वाझेला या कटात मदत करणाऱ्या निलंबित पोलिसासह एका बुकीला रविवारी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला बुकी नरेश रमणिकलाल गोर (३१) याने वाझे आणि त्याच्या साथीदाराला पाच बेनामी सीमकार्ड उपलब्ध करून दिल्याची माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे.

माजी पोलीस शिपाई विनायक शिंदे (५१) आणि बुकी नरेश गोर (३१), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. २००७ मध्ये वर्सोवा येथे झालेल्या लख्खन भैया एन्काऊंटर प्रकरणात शिंदेला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला या प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. अशात लॉकडाऊनमुळे मे २०२० मध्ये तो पॅरोलवर बाहेर आला आहे. बाहेर पडल्यानंतर तो वाझेच्या बेकायदेशीर कामात सहकार्य करीत असल्याची माहिती एटीएसच्या तपासात उघड झाली आहे. गोर याने वाझे आणि शिंदेला ५ बेनामी सीमकार्ड पुरविल्याची माहिती समोर आली. दोघांचाही या कटातील सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एटीएसने दिली आहे, तसेच यामागील मास्टरमाइंड कोण आहे, यात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याबाबत एटीएस अधिक तपास करीत आहे.