Join us  

राज ठाकरे यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन, मराठी भाषा दिनानिमित्त मनसेचा उपक्रम

By मनोहर कुंभेजकर | Published: February 27, 2024 4:54 PM

Raj Thackeray: वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते याच उद्देशाने मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने  वाचकांसाठी ५० नामवंत प्रकाशकांची ५० हजारांहून अधिक पुस्तकांचा ठेवा पुस्तक प्रेमी व वाचकांना पुस्तक प्रदर्शनातून घेता येणार आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते याच उद्देशाने मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने  वाचकांसाठी ५० नामवंत प्रकाशकांची ५० हजारांहून अधिक पुस्तकांचा ठेवा पुस्तक प्रेमी व वाचकांना पुस्तक प्रदर्शनातून घेता येणार आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज पार्क उद्यान येथील स्व. मीनाताई ठाकरे स्मरकाजवळ मॅजेस्टिक बुक डेपो यांच्या सहकार्याने पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तर मराठी संवर्धन मंडळाचे देखील सहकार्य मिळाले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन केले. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या या पुस्तक प्रदर्शनात पुस्तके न्याहाळून राज ठाकरे यांनी या प्रदर्शनाचे कौतुक केले. वाचकांसाठी हे प्रदर्शन रविवार दि, 3 मार्च  या कालावधीत सकाळी १० ते रात्री 8 या वेळेत पाहता येईल.

 यावेळी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, आयोजक यशवंत किल्लेदार, मॅजेस्टिक बुक डेपोचे अक्षय कोठावळे व पुस्तक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी यावेळी सुंदर आशा कवितेचे सादरीकरण केले. 

तर वाचनाची गोडी मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी आई वडिलांनी पुढाकार घेतला पाहिजे तसेच कुसुमाग्रज प्रतिष्टानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ग्रंथ तुमच्या दारी यांसारखे उपक्रम राबविले गेले पाहिजे असे आवाहन अभिनेते सुनील बर्वे यांनी केले.

यशवंत किल्लेदार म्हणाले की, 2008 पासून मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी, कवी संमेलन असे विविध कार्यक्रम मराठी भाषा दिनानिमित्त राबविण्यास मनसेने पहिली सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून यावर्षीही पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.पुस्तक प्रेमी व वाचकांसाठी पुस्तकांचा अमूल्य ठेवा मनसेने येथे उपलब्ध केला आहे.

कथा, कादंबरी ते विविध साहित्य, कार्टून चरित्र अशी 500 हुन अधिक लेखकांनी लिहिलेली वाचनीय पुस्तके या  या प्रदर्शनात मांडण्यात आली असून वाचकांना ही पुस्तके 15 -20 टक्के  सवलतीत घेता येतील.

टॅग्स :राज ठाकरेमराठीमुंबई