Join us  

‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ सुविधा पालिकेच्या सुपरस्पेशालिटी केंद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 4:41 AM

महापालिकेने बोरीवली पूर्व परिसरात गेल्या वर्षी सुरू केलेल्या 'सुपरस्पेशालिटी' उपचार केंद्रात मार्च २०१८ पासून ‘बोन मॅरो’ प्रत्यारोपण सुविधा देण्यात येणार आहे

मुंबई : महापालिकेने बोरीवली पूर्व परिसरात गेल्या वर्षी सुरू केलेल्या 'सुपरस्पेशालिटी' उपचार केंद्रात मार्च २०१८ पासून ‘बोन मॅरो’ प्रत्यारोपण सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे खासगी रुग्णालयात सुमारे २० ते २५ लाख रुपये एवढ्या किमतीत होणारे हे प्रत्यारोपण गरजू रुग्णांना आता जवळजवळ मोफत मिळू शकेल.‘थॅलेसेमिया’ग्रस्त रुग्णांमध्ये योग्य त्या प्रमाणात रक्त तयार होत नसल्याने त्यांना नियमितपणे रक्त देण्याची गरज असते. मात्र, या रुग्णांमध्ये अनुरूप बोन मॅरोचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आल्यास त्यांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणात रक्तपेशी, पांढºया पेशी व प्लेटलेट्स तयार करू लागते. परिणामी संबंधित रुग्ण थॅलेसेमिया मुक्त होऊन आपले पुढील आयुष्य सामान्यपणे जगू शकतात. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने हे पाऊल उचलले आहे. या सुविधेसह उपचार केंद्रात बालकांमधील रक्तदोष, कर्करोग यावरदेखील उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती उपचार केंद्राच्या संचालिका डॉ. ममता मंगलानी यांनी दिली आहे.या केंद्रात सध्या थॅलेसेमिया, रक्तदोष, कर्करोग रुग्णांकरिता १५ खाटा राखीव आहेत. तर ८ खाटा ‘बोन मॅरो’ प्रत्यारोपणासाठी राखीव आहेत. लवकरच सुरू होणाºया या प्रत्यारोपणासाठी सध्या १५ रुग्णांची नावे नोंदविण्यात आली आहेत. याचा उपचार कालावधी हा एक महिन्याचा असतो. यानुसार केंद्रात वर्षभरात ६० ते ८० रुग्णांवर प्रत्यारोपण कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयांपैकी दोन रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय आणि केंद्र सरकारचे टाटा स्मृती रुग्णालय यांचा समावेश आहे.एप्रिल २०१७ मध्ये बोरीवली पूर्व परिसरातील मेट्रो मॉलच्या पाठीमागे असणाºया ‘सीसीआय कंपाउंड’ परिसरातील तीन मजली इमारतीत हे केंद्र सुरू करण्यात आले. सुमारे २५ हजार चौरस फूट जागेत असणारे हे उपचार केंद्र सुरू करण्यासाठी टाटा ट्रस्ट, सिप्ला फाउंडेशन व थिंक फाउंडेशन यासारख्या सामाजिक संस्थांनी विशेष मदत केली होती.सामान्यपणे ८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये हे प्रत्यारोपण केल्यास चांगले परिणाम मिळतात. तसेच रुग्णाच्या भावाचा किंवा बहिणीचा 'बोन मॅरो' अनुरूप ठरू शकतो. यामुळे रुग्ण थॅलेसेमियामुक्त होण्याची शक्यता साधारणपणे ८० ते ९० टक्के असते.प्रत्यारोपणासाठी 'एचएलए' अनुरूप असल्याची चाचणी करणे आवश्यक असते. ती बाहेरच्या प्रयोगशाळेतून करून घेण्याची सोय उपचार केंद्रात केली आहे. या चाचणीसाठी रु. ५ हजार प्रति चाचणी एवढे शुल्क आकारले जाते. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलांसाठी ही सुविधा मोफत असणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थिती असणाºया मुलांकडून शुल्क न घेता दानशूर संस्थांच्या मदतीतून हा खर्च होणार आहे.'बोन मॅरो ट्रान्सप्लांट' करण्यासाठी १२ लाख रुपये प्रति रुग्ण खर्च अपेक्षित आहे. दारिद्र्यरेषेखालील मुलांसाठी कोणतेही शुल्क घेणार नाही. शुल्क भरण्याची तयारी असलेल्यांना यथाशक्ती शुल्क भरण्याची विनंती केली जाईल. ती रक्कम जमा केल्यानंतर उर्वरित रक्कम दानशूर संस्थांच्या मदतीतून मिळेल.

टॅग्स :डॉक्टर