Join us  

पाण्यासाठी बोंबाबोंब; सर्वपक्षीय  नगरसेवकांनी केल्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 1:27 AM

स्थायी समितीची बैठक झटपट तहकूब, स्थायी समिती अध्यक्षांच्या घरीही ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुढच्या वर्षी महापालिका निवडणूक असताना अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नगरसेवकांना घाम फुटला आहे. अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, चार वर्षे पाणीपुरवठा व्यवस्थित केला तरी शेवटच्या सहा महिन्यांत पाणी मिळाले नाही, तर बालंट लागते, अशी भीती सभागृह नेता यांनी व्यक्त केली. तर गेले सात दिवस आपल्याच घरी पाणी येत नसल्याची तक्रार खुद्द स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केल्यामुळे विरोधी पक्षही चक्रावले. 

गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे जुलै २०२१पर्यंत मुंबईला पाण्याचे टेन्शन नाही. मात्र, उन्हाळ्याची चाहुल लागताच अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला आहे. याबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत झटपट तहकुबी मांडली.  या तहकुबीवर सर्वपक्षीय सदस्यांनी आपापल्या विभागातील पाणी समस्या मांडली. पाण्याचे बिल भरण्यास विलंब झाला तर दंडही भरावा लागतो. त्यात काही कपात केली जात नाही, तर मग पाणी कमी मिळत असताना बिलाच्या रकमेत कपात का केली जात नाही? असा सवाल रवी राजा यांनी उपस्थित केला. गोरेगाव ते दहीसर ३० टक्के लोकसंख्या असूनही पाण्याचे असमान वाटप होते, अशी तक्रार भाजपचे कमलेश यादव यांनी केली. पाणीटंचाईने नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे यावेळी दिसून आले. 

वितरणात दोष....तलावात जलसाठा असताना अपुरा पाणीपुरवठा होत असेल तर त्यास वितरण व्यवस्थेतील दोष कारणीभूत आहे. वितरण व्यवस्थेत सुधारणा होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे  चावीवाले, व्हॉल्व्ह ऑपरेटर यांच्यावर कार्यकारी अभियंता यांनी नियंत्रण आणल्यास सर्वांना व्यवस्थित व समान पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला. वाढत्या लोकसंख्येचा ताण...मुंबईचे वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर येणारा ताण हेदेखील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचे कारण असू शकते. यासाठी अल्प व दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात याव्यात. तसेच पाण्याची नासाडी थांबवून काटकसर केल्यास पाणी समस्या सुटण्यास मदत होईल, असे मत काकाणी यांनी व्यक्त केले.

तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग सुरू केलेल्या वांद्रे विभागात आज लोकांना उत्तर देताना नाकीनऊ येत असल्याची नाराजी काँग्रेसचे असिफ झकेरिया यांनी व्यक्त केली. कोणी पाणीचोरी व गळतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप केले, तर कोणी टँकरमाफिया पाणी पळवत नाही ना? अशी शंका उपस्थित केली. मात्र पाणीटंचाईने नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे  यावेळी दिसून आले.